धक्कादायक! 46 शेतकऱ्यांचे करोडो रुपये थकवणाऱ्या भामट्याच्या APMC संचालकांना शुभेच्छा!
नवी मुंबई: एकीकडे शेतकरी कर्ज काढून काबाडकष्टाने शेतीत पीक घेतात. हेच पीक मोठ्या विश्वासाने मुंबई APMC मध्ये योग्य भाव मिळेल या अशाने पाठवतात. मात्र या ठिकाणी सुद्धा फसवणूक होऊन त्यांना आत्महत्येची वेळ आली असल्याचे प्रकरण कांदा-बटाटा मार्केटमध्ये समोर आले आहे. शेतक-यांच्या जीवावर चालवल्या जाणा-या मुंबई कृषी उत्पन्न कांदा-बटाटा बाजार समितीत ६ व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांना कोरोनाच्या नावाखाली करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. तर यातील काही व्यापाऱ्यांकडून बाजार समितीने शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले आहेत. मात्र, कारवाई झालेले काही व्यापारी दुसरा परवाना काढून आणखी शेतकऱ्यांना लुटण्याच्या प्रयत्नात आहेत. तर या प्रकारावर बाजार समिती सभापती अशोक डक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मार्केटमधील जवळपास ६ व्यापाऱ्यांनी शेकऱ्यांसह बाजार समिती आणि वित्तीय संस्थांचे करोडो रुपये थकवून बाजार समितीची फसवणूक केली आहे. या व्यापाऱ्यांचे गाळे बाजार समितीने सील केले आहेत. यातील मदन काळे या व्यापाऱ्याने देखील अशाच प्रकारे करोड रुपये थकवले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे शेतकऱ्यांचे पैसे थकवून कुप्रसिद्ध असलेला व्यापारी स्वतःला सुप्रसिद्ध सांगून संचालक अशोक वाळुंज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. बाजार समितीने ज्याचा गाळा सील केला आहे. जो बाजार समितीचा काळ्या यादीतील व्यापारी आहे, व्यापारी आणि शेतकऱ्यांचे करोडो रुपये देणे लागतो. असा माणूस बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीसमोर संचालकांच्या वाढदिवसाचे फलक लावतो याचा अर्थ काय? अशी चर्चा बाजार आवारात सुरु आहे. त्यामुळे कांदा-बटाटा मार्केट संचालक आणि या व्यापाऱ्याचे काही हितसंबंध तर नाही ना असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. तर कर्जबाजारी झाला असल्याचे बाजार समितीला लिहून देणारा हा मदन काळे बॅनरबाजीसाठी कोठून पैसे आणतो असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.
कांदा-बटाटा मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे ठेवले आहेत. तर मदन काळे यांच्या विरोधात ४६ शेतकऱ्यांच्या तक्रारी बाजार समितीमध्ये आहेत. जवळपास १ कोटी १९ लाख रुपये एवढ्या मोठ्या रक्कमेचा थकीत आकडा बाजार समितीकडे आहे. हि कारवाई होऊन सुद्धा सध्या मदन ट्रेडर्स नावाने मदन काळे हा बिगर गाळाधारक या परवान्यावर व्यापार करत आहे. सध्या त्याने आपले बस्तान एच २५० या गाळ्यात भाडेतत्वावर सुरु केले आहे. मात्र, या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र एवढ्या तक्रारी असताना बाजार समिती प्रशासन मदन काळेवर संबंधित कारवाई का करत नाही असा सवाल शेतकरी विचारात आहेत.
यावर थकीत रक्कमेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर सुनवाई घेतील असता लॉकडाऊन मुळे माझ्या विकलेल्या मालाची उधारी आली नसून मी कर्जबाजारी झालो आहे असे लेखी जबाब मदन काळे यांनी दिला आहे. तर सचिवांची परवानगी घेऊन संबंधित कायदयानुसार बाजार समितीने त्यांचा सागर एन्टरप्राइझेस नावाने असलेला जी-१७७ गाळा २७ सप्टेंबर २०२१ रोजी सील केला आहे. तसेच ज्यांची शेतकऱ्यांची आणि बाजार समितीची थकबाकी आहे. असे एकूण ६ गाळे वांदा उपसमितीसमोर पुढील कार्यवाहीसाठी ठेवलेले आहेत. ए-८८, इ-९९, सी ४७, ४५, एच २११ आणि जी १७७ हे गाळे वांदा बाजार समिती समोर असून या सर्वांनी शेतकरी, बाजार समिती आणि वित्तीय संस्थेचे करोडो रुपये थकवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
अशा प्रकारे दुसरा परवाना देत येत नसून ज्यांनी दिला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित परवाना रद्द करण्यात येईल अशी माहिती बाजार समिती सभापती अशोक डक यांनी APMCNEWS ला दिली.