आहारात ठेवा कांदा आणि ठेवा गंभीर आजार दूर
बदलत्या जीवनपध्दतींमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो. यात, मधुमेह उच्च रक्तदाब, ह्रदयरोग आदी आजारांचा प्रामुख्याने समावेश होत असतो. जगाच्या तुलनेत भारतात तर, मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढत आहे. लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, फास्टफूड आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणाबाहेर गेल्यास मधुमेहाचा धोका वाढू शकतो. वारंवार तहान लागणे, थकवा येणे आणि वारंवार लघवी होणे ही मधुमेहाची मुख्य लक्षणे आहेत. जेव्हा मधुमेहाची समस्या निर्माण होते, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. अशा परिस्थितीत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
आपल्या शरीराला अन्नातून ग्लुकोज मिळत असते. या ग्लुकोजचा वापर पेशी शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी करीत असतात. शरीरात इन्सुलिनची कमतरता असल्यास पेशी आपले काम नीट करु शकत नाही. परिणामी पेशींना ग्लुकोज मिळत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहणे अत्यंत महत्वाचे असते. अब्राका येथील डेल्टा स्टेट युनिव्हर्सिटीचे मुख्य अन्वेषक अँथनी ओजिह यांनी सांगितले की, कांदे अतिशय स्वस्त आणि सहज मिळणारी गोष्ट आहे. कांद्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात, ज्याचा उपयोग मधुमेहाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. प्राण्यांच्या अभ्यासात कांद्याच्या रसाच्या वेगवेगळ्या डोसचे परिणाम उंदरांच्या तीन वेगवेगळ्या गटांवर दिसून आले. यामध्ये उंदरांना दररोज 400 आणि 600 mg/kg कांद्याचा रस देण्यात आला. ते खाल्ल्यानंतर उंदरांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासली असता रक्तातील साखरेची पातळी 50 ते 35 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले.
ओजिह यांनी सांगितले, की कांदे रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतील अशा यंत्रणेची तपासणी केली परंतु त्याबद्दल अद्याप कोणताही पुरावा नाही. क्वेरसेटिन आणि सल्फर रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. या दोन्हीमध्ये मधुमेह कमी करण्याची क्षमता आहे. क्वेरसेटिन, जे एक फ्लेव्होनॉइड आहे, संपूर्ण शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. करंट मेडिसिनल केमिस्ट्री या जर्नलमध्ये प्रकाशित एक वैद्यकीय पेपर आहे. फ्लेव्होनॉइड्स हा पॉलीफेनॉलचा एक मोठा समूह आहे जो मानवी आहारात मोठ्या प्रमाणावर असतो. क्वेरसेटिनमध्ये आढळणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे ते मधुमेहासह अनेक रोगांवर परिणामकारक करू शकते. अभ्यासकांच्या मते क्वेरसेटिन आणि सल्फर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
भाज्यांमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म उच्च रक्तदाब कमी करण्यास आणि रक्त गोठण्यापासून संरक्षण करण्यास देखील मदत करतात. त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी कांद्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. या सर्व गुणांमुळे कांदा हृदयरोगी आणि हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.