Onion Farmer : कोसळलेल्या दरामुळे कांदा उत्पादक संतप्त
Onion Farmer : कोसळलेल्या दरामुळे कांदा उत्पादक संतप्त
नाशिक : वातावरणीय बदल, कांदा रोपवाटिकांचे नुकसान (Onion Nursery), त्यात लागवडीवर रोगांचा प्रादुर्भाव (Onion Disease) अशा प्रतिकूल परिस्थितीत यंदा लेट खरीप कांदा लागवडी (Onion Cultivation) झाल्या. ऑक्टोबरअखेर अतिवृष्टी राहिल्याने हंगाम महिनाभर लांबणीवर गेला.
या महिन्यात आवक वाढल्याने सरासरी दर (Cotton Rate) हे ४५० ते ७०० रुपये इतके खाली आले आहेत. चालू सप्ताहात आवक कमी होऊनही दर कोसळल्याची स्थिती आहे. त्यामुळे वाढलेला उत्पादन खर्च, एकरी उत्पादनात घट व सध्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
लेट खरीप कांद्याच्या उत्पादनासाठी राज्यात अव्वलस्थानी असणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने लागवडी पूर्ण करण्यात अडचणी आल्या.
काही शेतकऱ्यांनी दुबार रोपे तयार करून लागवडी पूर्ण केल्या. मागील वर्षी २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात ६०,८४३ हेक्टरवर लागवडी झाल्या. यंदा ५१,३२१ हेक्टरवर लागवडी पूर्ण झाल्या. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत ९,५२२ हेक्टर लागवडी कमी झाल्या आहेत.
त्यातच क्षेत्र घटले. तर दुसरीकडे एकरी उत्पादनात घट येऊन सरासरी ६० ते ८५ क्विंटलदरम्यान उत्पादन हाती येत आहे. यासाठी एकरी जवळपास ६५ ते ७५ हजार रुपये लागवड ते काढणीपर्यंत खर्च आला आहे. मात्र प्रत्यक्षात १०० रुपयांपर्यंत दर खाली आले आहेत
एकीकडे या कांद्याला साठवणूक क्षमता नसल्याने तो काढणीपश्चात तातडीने विकावा लागत आहे. पण सरासरी ५०० रुपयांच्या आसपास दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे.
दर घसरणीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र दिले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रश्नावर निवेदन दिले होते. सरकार हा विषय कधी गांभीर्याने घेणार, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
बाजार समितीनिहाय दरस्थिती प्रतिक्विंटल
लासलगाव...४००...१,१७०...७००
पिंपळगाव बसवंत...४००...१,२३९...६८०
सिन्नर...१००...७०१...५००
मनमाड...१००...८८३...५७५
चांदवड...३००...८५०...५००
नांदगाव...१००...७०१...४५०
उमराणे...३५०...८००..४७५