सोयाबीनच्या दरात घसरण; आणखी दर कमी होण्याची शक्यता
गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घट झाली आहे. दोन दिवसांपासून 400 रुपयांनी सोयाबीनचे दर घसरले आहेत. त्यात सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण सोयापेंड आयातीची मुदत ही वाढवून मार्च २०२२ करावी अशी मागणीच केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री यांनी विदेशी महासंचालकांकडे केली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात अणखीन घट होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कधी नव्हे ते यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येण्यास सुरवात झाली होती. खरीपाच्या सुरवातीपासून सुरु असलेली संकटाची मालिका आता तरी संपेन असे चित्र निर्माण झाले होते. कारण सोयाबीनच्या दरात दिवसाकाठी 100 ते 150 रुपयांची वाढ होत होती. मात्र, दोन दिवसांपासून सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे दर घसरले.
ऑगस्ट महिन्यात खाद्यतेलाच्या दरावर नियंत्रण रहावे म्हणून सोयापेंडची आयात करण्यात आली होती. तब्बल 12 लाख टन सोयापेंड हे आयात केले जाणार होते. मात्र, पहिल्या टप्प्यात 6 लाख 50 हजार टनच सोयापेंड आयात झाले होते. असे असताना त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला होता. व्यापारी, प्रक्रिया उद्याोजक यांना सोयापेंडचा पर्याय उपलब्ध झाल्याने सोयाबीन हे थेट 4 हजार 500 वर येऊन ठेपले होते. पण घटती आवक सोयापेंडचा साठा अंतिम टप्प्यात असताना सोयाबीनचे दर हे वाढत गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी सोयाबीनला 6 हजार 800 चा दर होता. मात्र, दर घटत असतानाच पुन्हा उर्वरीत 5 लाख 50 हजार टन सोयापेंड आयातीच्या चर्चेचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे.
सोयाबीन हे जागतिक स्तरावरील मुख्य पीक आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीचा थेट परिणाम येथील बाजार समितीवर देखील होतो. आता गेल्या दोन दिवसांमध्ये दरात जी घट होत आहे ती शेतकऱ्यांच्या लक्षात न येण्यासारखी आहे. कारण कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे दर घटले असल्याचे व्यापारी सांगत आहेत. यातच आता केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सोयापेंडच्या आयातीच्या अनुशंगाने लिहलेल्या पत्राचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झालेला आहे. सोयाबीनचे दर हे आता 6 हजारावर येऊन ठेपले आहेत.