मुंबई APMC भाजीपाला बाजारात पान टपरीवर कारवाई; अमली पदार्थाचा साठा केला जात असल्याचा अंदाज
मुंबई APMC भाजीपाला बाजारपेठेच्या खत प्रकल्पातील पडीक जागेत सुरु असलेल्या गैरधंद्यांवर तसेच अमली पदार्थ विकणाऱ्या पान टपरीवर आज कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका तुर्भे विभाग आणि बाजार समिती प्रशासनाने हि संयुक्तरित्या कारवाई केली. भाजीपाला बाजारातील गेट नं ७ जवळील पान टपरीवर सुद्धा मोठी कारवाई करत पोकलॅन मशीनद्वारे हि टपरी उचलून फेकून देण्यात आली. या पान टपरीत अमली पदार्थ विकले जात असल्याने यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केली होती.
राजन गुप्ता उर्फ मुन्ना हा गुटखा माफिया या ठिकाणी अमली पदार्थांची साठवणूक करत असे. शिवाय कारवाई करण्यात आलेला खत प्रकल्प गेली अनेक वर्ष वापराविना पडून होता. या प्रकल्पाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.
या परिसरातील गैरप्रकार थांबावेत याकरिता गेट क्रमांक ७ बंद करून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. तरी सुद्धा या ठिकाणी उपद्रवी नागरिकांकडून नशेल्या पदार्थांची विक्री आणि या जागेचा गैरवापर होत होता. त्यामुळे हि कडक कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर भाजीपाला बाजारातील पान टपऱ्या, अवैध खाद्यपदार्थ विक्रेते, कंटेनरमधील कार्यालय तसेच भाजीपाला बाजारात सुरु असलेल्या इतर अवैध व्यापारावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. 
भाजीपाला बाजारपेठेच्या ७ नंबर गेट वरून भाजीपाला बाजाराशी निगडित सर्व घटकांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु असते. यावेळी सुरु असलेल्या या   गैरप्रकारांमुळे बाजार घटकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. शिवाय चोरीच्या प्रमाणात वाढ होऊन रस्त्यात लूटमार होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे काही व्यापाऱ्यांसह बाजार घटकांनी याबाबत बाजार समिती आणि महापालिकेकडे तक्रार केली होती. याची दखल घेत महापालिका आणि बाजार समिती प्रशासनाने हि कारवाई केली.
परंतू भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करून आजही गुटख्यासह अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मार्केटमधील सर्व पाकळ्यांमध्ये हे विक्रेते छुप्या पद्धतीने व्यापार करत आहेत. तर काही अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरील टपऱ्यांवर कारवाई झाली परंतू बाजार आवारात देखील अशा पान टपऱ्या कार्यरत असून त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी बाजार घटक करत आहेत.