इतिहासात पहिल्यांदा मुंबई APMC ची राष्ट्रीय स्तरावर नोंद होण्याची शक्यता!
नायक सिनेमात अनिल कपूर सारखे बाजार समितीचे बी.डी. कामिठे सात दिवसाचे सहसचिव
अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणीचा पगार तर काम कनिष्ठ श्रेणीचे
बाजार समितीच्या १०४ कर्मचाऱ्यांची पदोन्नती नाही मात्र बी. डी. कामिठे ठरले भाग्यवान!
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार आपल्याला अनेक घटनांमधून दिसून येतो. मात्र आता असा कारभार समोर आला आहे कि मुंबई APMC ची राष्ट्रीय स्तरावर नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३१ मार्च रोजी निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्याला केवळ ८ दिवसासाठी पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे नायक सिनेमात जसे अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री झाले तसा हा प्रकार असल्याची चर्चा बाजार आवारात रंगली आहे. तर बाजार समितीच्या बोर्ड मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. तर गेली अनेक वर्षांपासून  शेकडो कर्मचारी  मुंबई APMC मार्केटमध्ये वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी घेत असून कनिष्ठ पदावर काम करत आहेत.
नुकतेच सेवानिवृत्त झालेले सहसचिव अविनाश देशपांडे यांच्या रिक्त जागी बी. डी. कामिठे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ सेवानिवृत्त होताना सहसचिव म्हणून निवृत्त झाल्याचा आनंद कामिठे यांना मिळणार आहे. मात्र सहसचिव कामिठे यांच्या सारखे अजून ५० ते ६० कर्मचारी बाजार समितीमध्ये पगार घेत आहेत. मात्र त्यांना पदोन्नती का नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय अशाप्रकारे १०४ जण पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेली आठ वर्षांपासून म्हणजेच २०१४ पासून कामिठे सहसचिव पदाचा पगार घेत होते. तर ते वरिष्ठ असल्याने त्यांना पदोन्नती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र असे अनेक कर्मचारी असून त्यांना एकट्यालाच हि पदोन्नती का? असा सवाल केला जात आहे. तर आस्थापना खर्च मर्यादा 45 टक्केच्या आत आल्यावर इतर पुढील लोकांना पदोन्नती देण्यात येणार असल्याचे प्रशासन सांगत आहेत.