शेतकऱ्याची मोठी फसवणूक : कापूस उत्पादकांची व्यापाऱ्याकडून क्विंटलमागे 30 ते 35 किलोंची लूट
शेतकऱ्याची मोठी फसवणूक : तोलाई केल्यानंतर १० क्विंटलची घट
फसव्या व्यापाऱ्यांचे पितळ उघडे पाडले.
जलगांव: शेतकऱ्यांची निकड, तसेच त्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन सदोष वजनकाट्याचा उपयोग करून एक क्विंटलमागे ३० ते ३५ किलो कापसाच्या लुटीचा प्रकार चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आला आहे.
लोंजे येथील शेतकरी मुन्ना साहेबराव चव्हाण या शेतकऱ्याने आपला ४० क्विंटल कापूस वेळोवेळी वेचणीनंतर मोजून घरात साठवून ठेवला होता. चव्हाण यांनी मुकटी येथील व्यापाऱ्यास त्याची विक्री केली. कापसाचा दर ७८०० रुपये प्रतिक्विंटल होता. पण या कापसाचे वजन व्यापाऱ्याने तोलाई केल्यानंतर केवळ ३० क्विंटल एवढे भरले. आपला ४० क्विंटल कापूस मोजून किंवा तोलाई करून घरात साठविला होता, त्यात काही महिन्यातच १० क्विंटलची घट कशी होऊ शकते, अशी शंका चव्हाण यांना आली.
ही बाब शेतकरी मुन्ना चव्हाण याने सरपंच व इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. नंतर त्यांनी संबंधित व्यापाऱ्याला याचा जाब विचारला. या प्रकाराची माहिती चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना दिली. आमदार चव्हाण यांनीदेखील तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तोपर्यंत संबंधित व्यापारी गावातून निसटला.
शेतकरी व आमदार चव्हाण यांनी संबंधित वजनकाट्यावर गावात कापसाची तोलाई केली असता वजनकाटा सदोष आढळला. यानंतर आमदार चव्हाण व शेतकऱ्यांनी कापूस, ट्रक, वजनकाटा असा मुद्देमाल घेऊन चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन गाठले. पोलिस निरीक्षक यांना यासंदर्भात माहिती दिली. यानंतर संबंधित व्यापाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.