ओमिक्रॉनला रोखायला NMMC आणि APMC ची तयारी कुठवर?
सध्या देशासह राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत पसरत आहे. हा व्हेरिएंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक घातक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या व्हेरिएंटचे दोन रुग्ण बाजुच्या कर्नाटक राज्यात आढळून आल्याने महाराष्ट्राची धाकधूक वाढली आहे. पण, कर्नाटक सरकारने मात्र याबाबतच्या खबरदारी घेण्यास आधीच सुरुवात केली असून महाराष्ट्रात काय असा सवाल निर्माण झाला आहे. .
याबाबत नवी मुंबई आयुक्त अभिजित बांगर यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून तपासणी आणि लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण केले जात आहे. तसेच शहरात मास्क वापरणे बंधनकारक असून लसीकरणावर जोर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर APMC मार्केटमध्ये गेली सहा महिन्यापासून तपासण्या सुरु आहेत. त्या ठिकाणी लसीकरण वाढवण्यात येईल. एपीएमसी प्रशासन या कामात ढिले पडत असल्याने थोड्या-थोड्या कालावधीने त्याने जागे करावे लागते. पुढील खारबारदारसाठी त्यांना पुन्हा आदेश देण्यात आले आहेत. शिवाय परराज्यातून येणाऱ्या वाहन चालक व संबंधित लोकांची तपासणी बंधनकारक करण्याचे आदेश APMC प्रशासनाला देण्यात येतील असे बांगर यांनी सांगितले.
कर्नाटक राज्यातून मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सुरण, भोपळा, आले, केळी, अननस, कलिंगड, मिर्ची, कांदा बटाटा आणि मका हा शेतमाल मोठ्या प्रमाणात येतो. या वाहनांमध्ये चालकासह काही लोक येत असतात. मात्र मार्केटमध्ये प्रवेश करताना या लोकांची कुठली तपासणी होत नाही. त्यामुळे एपीएसमसी मध्ये ओमिक्रोन विषाणू पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या इचलकरंजी लगत असणाऱ्या बोरगाव मार्गी मोठ्या प्रमाणात लोक कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येजा करत आहेत. कर्नाटक सरकारने या ठिकाणी नाकाबंदी केली असून महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वाहनधारकांची तपासणी केली जात आहे. आयको स्पिनिंग मिल जवळ कर्नाटक-महाराष्ट्र सीमारेषा आहे. महाराष्ट्र बोर्डजवळ महाराष्ट्र पोलीस आणि आरोग्य तपासणी नसल्यामुळे कर्नाटकातून राजरोसपणे लोक महाराष्ट्रात येत आहेत. पण, महाराष्ट्र राज्यातून जाणाऱ्यांची कर्नाटकातील चेकपोस्टकडून तपासणी होत आहे.
महाराष्ट्र आरोग्य तपासणी यंत्रणेकडून, पोलिसांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नाहीये. फक्त नॅशनल हायवेवर नाकाबंदी करण्यात आली आहे. चोर वाटेमुळे हजारो नागरिक कर्नाटक आणि महाराष्ट्रातून ये-जा करत आहेत. त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस कधी जागे होणार असा सवाल निर्माण झाला आहे.