विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. शिवाय विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. त्यामुळे नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपयांचा विमा देण्याच्या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रास्तारोको करण्यात आला. अतिवृष्टीने नुकसान होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी विमा कंपन्या वेळकाढूपणा करीत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी आंदोलनातून करण्यात आली.
खरीप पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उत्पादनातून नाहीतर किमान विमा रकमेतून का होईना चार पैसे पदरात पडतील. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विमा रक्कम कंपनीकडे अदा केलेली आहे. पण आता परताव्याच्या दरम्यान वेळकाढूपणा केला जात आहे. शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील सोलापूर-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी रास्तारोको करण्यात आला होता.
शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांचा विमा काढला होता. शिवाय पावसामुळे पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. कृषी विभाग आणि कंपनीच्या प्रतिनीधींनी पंचनामेही केले. मात्र, या दरम्यान कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. असे असतानाही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात अधिकतर बजाज अलंयन्स कंपनीने अधिक प्रमाणात विमा काढलेला आहे. वेळेत शेतकऱ्यांचे पैसे अदा न केल्याने या विमा कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावळी आंदोलकांनी केली होती.
यंदा पावसामुळे खरिपातील कोणतेच पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. अधिकचे नुकसान लक्षात घेता हेक्टरी 20 हजाराची भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. सोलापूर-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावरच शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको केल्याने दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
विमा कंपन्यांनी वेळेत शेतकऱ्यांचे पैसे अदा केले नाही, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बैठकीत दिले होते. आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीच आंदोलन केले असून बजाज अलंयन्स कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या कंपनीवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.