नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी झळाळी; प्रवाशांच्या समस्यांवर सिडकोची विशेष समिती स्थापन
नवी मुंबई: येत्या १५ दिवसांत सिडको तर्फे एक विशेष समिती नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांना भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सिडकोसह रेल्वेच्या कामांची व्याप्ती, नवी मुंबई महानगरपालिकेची भूमिका, स्थानकांवरील समस्यांसंदर्भातील त्रुटी दूर करण्याकरिता आढावा समितीकडून घेतला जाणार आहे. त्यानंतर यासंदर्भातील अहवाल समितीकडून उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांना सादर केला जाणार आहे.
रेल्वे परिसरातील अनाधिकृत फेरीवाले, पार्किंगचा गैरवापर, दुकानदारांचा मार्जिनल स्पेस वापर तसेच स्थानकांच्या परिसरात चालणारे अवैध धंदे या प्रमुख बाबी समितीच्या भेटीत पहिल्या जाणार आहेत. शिवाय परिसरात राहणाऱ्या बेघर कुटुंबाकडून रेल्वे स्थानकांची होत असलेली दुरावस्थ याचाही पहाणी केली जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि परिसरात अवैध धंद्यांसह स्थानकांना घाणेरडे करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.
सिडकोच्या रेल्वेस्थानकांवर प्रवाशांशी निगडित सोईसुविधांबाबत विविध विषयांचा आढावा घेऊन, त्यावर योग्य देखभालीसाठी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्यातर्फे एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांसह या समितीमध्ये अन्य पाच अधिकारी देखील सदस्य आहेत.
नवी मुंबई मुंबईला जोडली जावी याकरिता सिडकोने रेल्वेच्या साह्याने नवी मुंबईमध्ये उपनगरी रेल्वे मार्गांचे जाळे निर्माण केले. सिडकोने विकसित केलेली रेल्वेस्थानके वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रशस्त फलाट, भव्य फोरकोर्ट एरिया स्थानकांवर वाणिज्यिक संकुलांची उभारणी यांमुळे रेल्वेस्थानके ही अन्य उपनगरी स्थानकांच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सिडकोतर्फे सीवूडस दारावे स्थानकवगळता उर्वरित स्थानकांची देखभाल केली जाते. तथापि, प्रवाशांना या रेल्वेस्थानकांवर कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये, या पार्श्वभूमीवर डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली आहे.
समितीमध्ये सहव्यवस्थापकीय संचालकांव्यतिरिक्त सिडकोतील मुख्य • अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) (सदस्य), अधीक्षक अभियंता (पालघर व नगर नियोजन - १ ) ( सदस्य सचिव), पणन व्यवस्थापक ( वाणिज्यिक) (सदस्य), नवी मुंबई महानगरपालिका प्रतिनिधी (सदस्य) आणि भारतीय रेल्वेचे प्रतिनिधी (सदस्य) यांचा समावेश आहे.
नवी मुंबईला सदैव गतिमान ठेवण्यामध्ये येथील उपनगरी रेल्वेची भूमिका महत्त्वाची आहे. नवी मुंबईतील उपनगरी रेल्वे नेहमीच कार्यक्षम राहावी यावर सिडकोने नेहमीच भर दिला आहे. प्रवाशांना सोईसुविधा अधिक योग्य पद्धतीने प्रदान करण्याकरिता विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, यामुळे प्रवास अधिक सुखकर होणार असल्याची माहिती सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.