नवी मुंबई पोलिसांकडून ६० लाखांचा गुटखा जप्त; मुद्देमालासह ७ आरोपी जेरबंद
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी महापे येथून लाखोंचा गुटखा साठा जप्त केला आहे. तीन टेम्पोंमधून हा गुटखा त्याठिकाणी आणण्यात आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे. महापे परिसरात गुटख्याने भरलेले टेम्पो येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे गुन्हे शाखा पोलिसांनी   पहाटे महापे परिसरात सापळा रचला होता. यामध्ये तीन छोटे टेम्पो त्याठिकाणी आले असता पोलिसांनी झडप टाकून संबंधितांना ताब्यात घेतले. यावेळी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे ६० लाखांहून अधिक किमतीच्या   १०० हून अधिक गोण्यांमध्ये गुटखा आढळून आला.
कारवाई दरम्यान इसरार अहमद नियाज अहमद शेख, सुरज हरीश ठक्कर, सस्तु रामेत यादव, नितीन बाबुराव कसबे, नौरूद्दीन अलिशौकत सय्यद, मोहम्मद नफिस रफिक शेख व पवनकुमार पन्नालाल श्रीवास्तव या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर टेम्पो व त्यामधील गुटखा पोलिसांनी जप्त केला असून, हा गुटखा कुठून आणला होता व शहरात कोणाला पुरवला जाणार होता याचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलीस करत आहेत. त्याशिवाय या गुटखा पुरवठ्याच्या रॅकेटमध्ये शहरात सक्रिय असलेल्या सूत्रधाराच्या देखील शोधात पोलीस आहेत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पोलिसांना चकमा देऊन पळालेला गुटखामाफिया करण साळुंखे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे त्याच्याकडूनच अद्यापही शहरात गुटखा विक्रीचे रॅकेट चालवले जात आहे का, अशीही शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलीसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघन माळी यांच्या पथकाने हि कारवाई केली.