पीक विम्यासाठी धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी स्वत:ला घेतले जमिनीमध्ये गाढून
पीकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान देण्याच्या बाबतीत राज्य सरकारकडून वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले जात असल्याचा आरोप करत बुधवारी सोनेगाव येथे संतप्त शेतकर्यांनी स्वत:ला जमिनीमध्ये गाढून घेत आंदोलन केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी केले आहे.
पीक विमा भरूनही शेतकर्यांना हक्काची भरपाई मिळालेली नाही. एवढेच नाही तर अतिवृष्टीमुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या अनुदानाचा पत्ता नाही. प्रत्येकवेळी सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. परंतु, आजवर आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. संबंधित प्रश्नाच्या अनुषंगाने वेगवेगळी आंदोलनेही केली. मात्र, त्याचाही सरकारवर काहीच परिणाम झाला नाही, असा आरोप करीत बुधवारी धाराशिव तालुक्यातील सोनेगावात संतप्त शेतकर्यांनी स्वत:ला छातीपर्यंत जमिनीत गाढून घेत आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, यानंतरही न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.