मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील थकीत पैसे मिळाल्याने शेतकरी आनंदात; शेतकऱ्याकडून व्यापारी आणि मध्यस्थाचे आभार
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवून व्यापारी पोबारा करत असल्याची अनेक उदाहरणे येथे पाहायला मिळत आहेत. तर शेतकरी बाजारात खेटा घालून हैराण होत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, अशाच कर्नाटकातील एका शेतकऱ्याची थकीत पैसे मिळाल्याने त्याने समाधान व्यक्त केले आहे. व्यापारी दशरथ शिंगाडे यांच्या मध्यस्तीने व्यापारी शिवाजी अभंग यांनी या शेतकऱ्याला तडजोडी अंत ३ लाख ५० हजार रुपये दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याने शिंगाडे आणि अभंग या दोघांचेही आभार व्यक्त करत रक्कम स्वीकारली आहे.
कर्नाटक येथील सय्यद मशुद नामक शेतकऱ्याने कैरी व्यापाऱ्याकडे पाठवलेल्या मालाचे ४ लाख ५० हजार रुपये थकबाकी असल्याचे सांगितले होते. याबाबत मुंबई बाजार समितीला तक्रार अर्ज हि दिला होता. शिवाजी विष्णू अभंग ए-१८३ या गाळ्यावर कैरी माल पाठवला होता. मागील व चालू वर्षाची एकूण थकबाकी जवळपास ५ लाख ५० हजार असल्याचे शेतकऱ्याने दिलेल्या हिशोबपत्रातून दिसत आहे. मात्र, गेली अनेक दिवसांपासून येरझाऱ्या मारून सुद्धा शेतकऱ्याला पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याने पैसे न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याची भावना व्यक्त केली होती. पैसे बाकी राहिल्याने जमीन विकली असून उर्वरित जमीन गहाण ठेवली असल्याचे शेतकरी म्हणाला होता. व्यापारी फेऱ्या मारायला लावत असून तारखेवर तारीख देत देऊन फोन केल्यावर फोन देखील स्विकारत नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले होते.
व्यापाऱ्याला बोलावून थकीत रक्कमेबाबत माहिती घेतली असता व्यापाऱ्याने दिवाळीपर्यंत पैसे देतो असे लेखी दिले आहे. तसेच पैसे न दिल्यास बाजार समितीने पुढील कारवाई करावी असे देखील मान्य केले असल्याचे उपसचिव मारुती पवितवार यांनी सांगितले होते. मात्र, या प्रक्रिये आधीच शेतकऱ्याला त्याचे पैसे मिळाल्याने त्याच जीव भांड्यात पडला आहे.