कापसाच्या दरात वाढ, आवकही वाढली, सोयाबीनसह तुरीच्या दरात चढ उतार सुरु
कापसाच्या दरात वाढ, आवकही वाढली, सोयाबीनसह तुरीच्या दरात चढ उतार सुरु
नवी मुंबई : विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात वाढ होऊन आवकही वाढली आहे. आज ८ हजार ४५० पासून ८ हजार ९०० रूपयांपर्यत कापसाला भाव मिळाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा भाव कमी असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. मागील वर्षी फ्रेब्रुवारी मार्चमध्ये १३ ते १४ हजार रूपयांपर्यंत कापसाला भाव होता. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दरात चढ़-उतार होत असल्यानं दहा हजारांचा टप्पा तरी कापूस पार करेल का याबाबत शंका वाटत आहे. कापसाच्या दरात कधी सुधारणा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दर कमी असल्यामुळं अद्याप शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही.
मागील वर्षी म्हणजे २०२२ फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये अकोटच्या बाजारात तेरा ते चौदा हजार पर्यंत कापसाला भाव मिळाला होता. मिळालेल्या या बाजारभावामुळं अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीची लागवड वाढवली होती. पण, अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या या पिकावर पाणी फेरले. पिकात मोठ्या प्रमाणात घट झाली, त्यातही शेतकऱ्यांनी कापसाचे पीक वाचवलं, मात्र आता हाती आलेल्या शेतमालाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याचं चित्र आहे.
आज अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या दारात वाढ होऊन आवकही वाढली, कापसाच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली असून ८ हजार ४५० पासून ८ हजार ९०० रूपयांपर्यत कापसाला भाव होता. तर कालपेक्षा आज कापसाची आवक वाढली असून ३ हजार ५१५ क्विंटल इतका कापूस खरेदी झालाय. आतापर्यंत आकोटच्या बाजारात ११० हून अधिक क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. कालचा ८ हजार २१५ पासून ८ हजार ८६० रुपयांपर्यंत भाव होता. तर आवक २ हजार ८१० क्विंटल इतकी होती. दरम्यांन कपाशीचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही.
सोयाबीनचे दर स्थिर तर तुरीच्या दरात घसरण
सोयाबीनला सरासरी काल सोयाबीन ४ हजार ९२५ पासून ५ हजार ३१५ रूपयांपर्यत भाव होता. आज ४ हजार ८८० ते ५ हजार ३१५ रूपयांपर्यत भाव मिळत असून सोयाबीनचे दर स्थिर आहेत. मात्र, तुरीच्या दरात घसरण झाली आहे. मात्र, तुरीची आवक वाढत आहे. तुरीला आज ६ हजार ८०० पासून ७ हजार ६२५ रूपये इतका भाव आहे. ७५ रुपयांनी तुरीच्या दरात घसरण पाहायला मिळाली असून तुरीची आवक २ हजार ५१० क्विंटल झाली आहे. सद्यस्थितीमध्ये तुरीचे दर बाजारात टिकून आहेत. तसेच पुढील काळातही तुरीला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.