ज्वारीच्या क्षेत्रात ७६ हजार हेक्टरने घट; गहू, मका, हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल
ज्वारीच्या क्षेत्रात ७६ हजार हेक्टरने घट गहू, मका, हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल
नवी मुंबई : यंदाच्या रब्बी ज्वारीच्या लागवड क्षेत्रात गेल्या वर्षांच्या तुलनेत सुमारे ७६ हजार हेक्टरने घट झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारी पेरणीच्या काळात परतीचा पाऊस सुरू होता. शिवाय दर कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी गहू, मका, हरभऱ्याची पेरणी केली आहे. 
सन २०१६ ते २०२१ या काळात राज्यातील रब्बी हंगामातील ज्वारीचे सरासरी क्षेत्र १७,३६,२८६ हेक्टर इतके राहिले आहे. त्यापैकी मागील वर्षी १३,६८,३८४ हेक्टरवर पेरणी झाली होती. तर यंदा १२,९२,४११ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदाचे क्षेत्र मागील वर्षांच्या तुलनेत ७५,९७३ हेक्टरने कमी आहे.
राज्यात खरीप आणि रब्बी, अशा दोन्ही हंगामात ज्वारीची लागवड केली जाते. त्यापैकी रब्बीतील क्षेत्र जास्त आहे. कमी पावसाच्या, कोरडवाहू भागात ज्वारीचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जात होते. मात्र, यंदा परतीचा पाऊस ऑक्टोबरअखेपर्यंत सुरू होता. त्यामुळे वेळेत ज्वारीची पेरणी होऊ शकली नाही. सिंचन योजनांच्या पाण्यामुळे आणि मागील चार वर्षांपासून मोसमी पाऊस चांगला होत असल्यामुळे पाण्याची उपलब्धता चांगली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी फळपिके आणि नगदी पिकांवर जास्त भर दिला आहे. त्यामुळे रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.