'राजकारणात काहीही होऊ शकतं' हा पॅटर्न पुन्हा येणार? देवेंद्र फडणवीस यांची धावती भेट, सुधीर मुनगंटीवार यांची ऑफर, ठाकरेंचे संकेत काय ?
मुंबई : राजकारणात काहीही होऊ शकतं असा पॅटर्न महाराष्ट्रात रुजू लागलाय. 2019 पासून ते आज पर्यंत या पॅटर्नची होत आहे. 2019 मध्ये राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि त्यानंतर कुणाचं सरकार येईल अशी चर्चा सुरू असतांना राष्ट्रवादीसोबत भाजपने सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडी स्थापन करत नवं सरकार आणण्यात आलं. त्यानंतर अडीच वर्षानंतर शिवसेनेत उभी फुट पडली आणि त्यानंतर राज्यात पुन्हा सत्तांतर झाले. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चाळीस आमदारांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं हा पॅटर्नची निर्माण झाला.
खरंतर राजकारणात काहीही होऊ शकतं असं अनेकदा बोललं जातं पण तसं होईलच याची शास्वती नसते. पण गेल्या तीन वर्षात झालेल्या घडामोडी पाहता राजकारणात काहीही शक्य आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही अशी स्थिती आहे.
त्यातच आज सकाळी विधिमंडळात प्रवेश करत असतांना सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरा समोर आले होते. त्यामध्ये त्यांची चालता बोलता झालेली चर्चा चर्चेचा विषय ठरत असतांना सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेत निवेदन करत असतांना अप्रत्यक्षरित्या ऑफरच देऊन टाकली होती.