अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा होणार फायदा; वाचा सविस्तर
देशातील पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना केंद्रीय अर्थसंकल्पात या राज्यांसाठी भरघोस तरतुदी केल्या जातील, असा अंदाज लावला जात होता. मात्र या राज्यांसाठी विशेष अशी कोणतीही आर्थिक तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासाठीदेखील विशेष कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र राष्ट्रीय पातळीवरील ज्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, त्यांचा महाराष्ट्रातील जनतेवरही थेट परिणाम दिसून येईल. त्यामुळे महाराष्ट्रासाठी या घोषणा महत्त्वाच्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज नदीजोड प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. अर्थसंकल्पात त्यांनी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाढवण्यावर भर दिला. जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीने देशातील ५ मोठ्या नद्या जोडण्याचे कामही केले जाणार. महाराष्ट्रातील तापी – नर्मदा, गोदावरी-कृष्णा आणि दमनगंगा- पिंजल या प्रकल्पांना जोडलं जाणार आहे. त्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे.
अर्थमंत्र्यांनी किसान ड्रोन्सचा वापर आता शेतीमध्ये केला जाईल, अशी घोषणा केली. पिकांची पाहणी करणे, जमिनीच्या नोंदी ठेवणे तसेच किटकनाशकांच्या फवारणीसाठी हे कृषी ड्रोन्स वापरले जातात. कृषी आणि पिक उत्पादनासाठी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जा्स्त वापर होऊ शकेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही फायद्याची योजना ठरू सकेल.
यापुढे जमिनीची कागदपत्रे डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. तसंच जागांचं रजिस्ट्रेशन कागदपत्रांच्या आधारे कार्यालयात न जाता कुठूनही करता येईल, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.