कोल्ड स्टोरेजमध्ये माल साठवून तिथूनच व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने होणार रद्द!
मुंबई APMC बाजार समिती परिसरातील शीतगृह (कोल्ड स्टोरेज) मध्ये माल साठवून परस्पर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता चाप बसणार आहे. बाजार समितीने घेतलेल्या बैठकीत अशाप्रकारे शेतमाल साठवण्याच्या ठिकाणी अवैध व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा तसेच त्या कोल्ड स्टोरेजवर देखील कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून इराणी सफरचंदाचा व्यापार माल साठवणूक कोल्ड स्टोरेजमधून होत असल्याची माहिती APMC NEWS ने लाइव्ह दाखवली होती. यावर बाजार समिती सभापती अशोक डक, फळ व्यापारी आणि दक्षता पथक अधिकाऱ्यांनी धाड टाकताच येथे व्यापार होत असल्याचे निदर्शनास आले. यावर आजची बैठक बाजार समिती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कोल्ड स्टोरेजमधून कोणताही व्यापार केला जाऊन नये अशा सूचना कोल्ड स्टोरेज आणि गोडाऊन मालकांना देण्यात आल्या. या प्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, सभापती अशोक डक, सचिव संदीप देशमुख, फळ व्यापारी, दक्षता पथक अधिकारी, कोल्ड स्टोरेज आणि गोडाऊनच मालक उपस्थित होते.
या कोल्ड स्टोरेज मधून करोडो रुपयाच्या मालाची विक्री प्रतिदिन होत होती. शिवाय या ठिकाणाहून राज्याबाहेर देखील माल पाठवला जात होता. त्यामुळे बाजार समितीचा मोठ्या प्रमाणात सेस बुडत होता. शिवाय यात बाजार आवारातील काही व्यापारी देखील आपला माल कोल्ड स्टोरेज मधून परस्पर विक्री करत होते. त्यामुळे बाजार समितीने २५ कोल्ड स्टोरेजला नोटीस दिले होते. मात्र, या इराणी व्यापाऱ्यांनी थेट अशा प्रकारे माल विकण्याचे धाडस केल्याने त्यांना सामील असलेल्या लोकांचा छडा लावून कारवाईची मागणी बाजार घटक करत आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारांतर्गत अनेक 'कोल्ड स्टोरेज' आणि गोदामे आहेत. या गोदामांमध्ये केवळ माल साठवणुकीला आणि जतन करण्यास परवानगी असतानाही त्यामधून थेट व्यापार होत असल्याचे प्रकार उघडपणे घडत आहेत. या गोदामांमधील कृषिमाल बाजार समितीमध्ये आणून त्याची नोंद करून, त्याचा सेस, कर बाजार समितीला भरून मग तो माल घाऊक बाजारात विकण्यास परवानगी आहे. मात्र अनेक गोदाममालक यातील माल थेट किरकोळ व्यापाऱ्यांना विकत आहेत. शिवाय, थेट बाहेरच्या बाहेरच माल किरकोळ व्यापाऱ्यांना पाठवत आहेत. त्यामुळे बाजार समितीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशातील, विविध कानाकोपऱ्यांतून, जगाच्या विविध भागांतून कृषी माल येत असतो. आयात होणारा माल मोठ्या प्रमाणात असल्याने तो एकाच दिवशी खपत नाही. त्यामुळे कोल्ड स्टोरेज, गोदामामध्ये ठेवून हा माल जतन करणे गरजेचे आहे. त्यासाठी बाजार समितीच्या लगतच अनेक कोल्ड स्टोरेज, गोदामे आहेत. यासाठी बाजार समितीची परवानगी गरजेची असते. त्यानुसार, येथील घडामोडींशी बाजार समिती संलग्न राहते. परदेशातून आपल्याकडे अनेक प्रकारची फळे येतात. हंगाम असताना मोठ्या प्रमाणात येथील व्यापारी गोदामांचे मालक ती मागवतात आणि जशी मागणी असते त्या प्रमाणात विक्रीसाठी बाहेर काढतात. या गोदामांना केवळ माल साठवण्याची परवानगी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या गोदामांमधून परस्पर व्यापार सुरू झाला आहे.
मार्केट बाहेरील कोल्ड स्टोरेज आणि गोदामांमध्ये व्यापार होत असल्याने मार्केटमधील व्यापाऱ्यांवर त्याचा परिणाम होत होता. बैठकीत अशा प्रकारे व्यापार न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय दक्षता पथकाला कोल्ड स्टोरेज परवानगी नाकारत असल्याने याबाबत गृहमंत्री आणि पणन मंत्री यांच्या बैठकीत अवैध व्यापाऱ्यांवर कारवाईच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. आमदार शशिकांत शिंदे
कोल्ड स्टोरेजमध्ये माल साठवणूक ऐवजी व्यापार केला जात होता. हे आमच्या पाहणीमध्ये लक्षात आल्याने आम्ही आजची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत केवळ माल साठवली जाईल आणि व्यापार केला जाणार नसल्याची खात्री कोल्ड स्टोरेज मालकांनी दिली आहे. तसेच कोणत्या व्यपाऱ्यांनी या ठिकाणी माल साठवणूक करून परस्पर व्यापार केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील. सभापती अशोक डक