राज्यभरात सोयाबीनची चलती,शेतकऱ्याची उत्पन्नावर काय परिणाम?
नवी मुंबई :सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे याची प्रचिती सध्या राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होत असलेल्या आवक वरुन समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे अस्थिर होते. मात्र, नववर्षापासून सोयाबीन हे 6 हजार 300 रुपयांपर्यंत स्थिरावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूकीतले सोयाबीन विक्रीला सुरवात केली आहे. बुधवारी राज्यभरातील 43 बाजार समित्यांमध्ये तब्बल 3 हजार 396 टन सोयाबीनची आवक झाली आहे. सोयाबीनच्या दराला घेऊन साठवणूक की विक्री हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न होता. पण महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर आता कुठे दर स्थिरावले असल्याने टप्प्याटप्प्याने का होईना सोयाबीनची आवक बाजार समित्यांमध्ये सुरु झाली आहे. राज्यभरात हे चित्र असले तरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र, तूर डाळीची सर्वाधिक उलाढाल झाली आहे.
राज्यात 306 बाजार समित्या तर 623 उपबाजारपेठा
कृषी व्यापाऱ्याचा दृष्टीने बाजार समित्या ह्या महत्वाची भूमिका बजावत आहेत. यापैकी 43 बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा व्यापार हा सुरु आहे. आतापर्यंत योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता. सध्या 4 हजार ते 7 हजार 100 रुपयांपर्यंत सोयाबीनला दर मिळत आहे. त्यामुळे आवक वाढत आहे. राज्यातील अकोला, लातूर या मुख्य बाजार समित्यांमध्ये आवक ही वाढलेली आहे. असे असले तरी शेतकरी हे टप्प्याटप्प्यानेच सोयाबीनची विक्री करीत आहेत.
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये डाळीची उलाढाल
राज्यभरात सोयाबीनची चलती असली तरी मुंबई एपीएमसी धान्य मार्केट घाऊक बाजारात मात्र, सोयाबीनची नाही तर तूरीच्या डाळीची उलाढाल वाढलेली आहे. कडधान्यापेक्षा येथे डाळीलाच अधिकची मागणी आहे. ज्या शहरांमध्ये प्रक्रिया उद्योग आहेत त्या ठिकाणी मात्र, सोयाबीनला अधिकची मागणी होते.मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये गुरुवारी ३२० टन तूरीच्या डाळीची आवक झालेली आहे. तर ९ हजार ते 1२ हजाराचा दर मिळालेला आहे.
सोयाबीनच्या दराबाबत अजूनही शेतकरी आशादायी
हंगाम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना अपेक्षित दराची प्रतिक्षा कायम राहिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता साठवणूक करणे पसंत केले होते. मुहूर्ताच्या सोयाबीनला थेट 11 हजाराचा दर हिंगोली आणि अकोला बाजार समितीमध्ये मिळाला होता. त्यामुळे दर वाढीबाबत शेतकरी आशादायी होते. शिवाय उत्पादनात घट असल्याने दर वाढतील असा विश्वास शेतकऱ्यांना होताच त्यामुळे त्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीला महत्व दिले आणि हंगामाच्या अंतिम टप्प्यात त्यांचा निर्णय योग्य ठरलेला आहे.