सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली, उद्या काय होणार? निकालाचं काऊंटडाऊन सुरु होणार?
नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरु असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोर्टातील आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर संपली. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे (Harish Salve), नीरज कौल आणि महेश जेठमलानी यांनी जोरदार युक्तिवादांद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारची बाजू लावून धरली. सरन्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांचे मुद्दे ऐकून घेतले. उद्यादेखील या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उद्याच्या कोर्टरुममध्ये राज्यपालांचे वकील तुषार मेहता तर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल त्यांची बाजू मांडतील. तर उद्यापर्यंत दोन्ही बाजूचे युक्तिवाद संपवण्याचा प्रयत्न असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आजच्या सुनावणीतले 10 मुद्दे कोणते?
राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना न्यायालय पुन्हा बोलावू शकत नाही- शिंदे गटाचे वकील हरिश साळवे
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानेच बहुमत चाचणीचा निर्णय झाला. यात राज्यपालांची चूक काय, असा युक्तीवाद नीरज कौल यांनी केला.
निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांना डावलून कोर्ट निर्णय देऊ शकतं का, असा सवाल नीरज कौल यांनी युक्तिवादादरम्यान केला.
उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही चर्चेशिवाय गटनेते पदावरून शिंदेंना हटवलं, असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला.
शिंदे गटात फूट पाडायची होती. त्यासाठी आधी १६ आमदारांना नोटीस देण्यात आली. पण सरकार आल्यानंतर ते ३९ आमदारांवर बोलायला लागले- जेठमलानी.
अपात्रतेच्या कारवाईसाठी १४ दिवसांची नोटीस देणं बंधनकार होतं- महेश जेठमलानी
ठाकरे गटाने तेव्हा जारी केलेला व्हीप बेकायदेशीर आहे. व्हीप विधीमंडळ कामकाजासाठी असतो- जेठमलानी
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदेंनी बहुमत सिद्ध केलं- हरिश साळवे
ज्यांचं बहुमत असेल त्यांचं सरकार बनतं- हरिश साळवे
नवीन सरकार स्थापन होताना संविधानिक मुल्यांचं उल्लंघन झालेलं नाही, असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला.
निकालाचं काऊंटडाऊन सुरू? उद्या काय?
सुप्रीम कोर्टातील या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलंय. उद्या या सुनावणीचा शेवटचा दिवस असल्याचं म्हटलं जात होतं. यावरून अॅड. सिद्धार्थ शिंदे म्हणाले, उद्या आणि परवा दोन दिवस युक्तिवाद ठेवण्यात आला आहे. उद्या 1 तास तुषार मेहता राज्यपालांच्या आणि त्यानंतर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसिंघवी युक्तिवाद करतील. ठाकरे गटाच्या वकिलांना युक्तिवादासाठी जास्त वेळ हवा आहे. पण परवापर्यंत युक्तिवाद संपवण्याच्या सूचना कोर्टाने केल्या आहेत. परवा म्हणजेच 16 मार्च रोजी युक्तिवाद संपल्यानंतर हा निकाल कोर्टाकडून राखून ठेवण्यात येईल आणि घटनापीठातील सदस्यांकडून नंतर निकालाची सुनावणी होईल. त्यामुळे युक्तिवादाचे फक्त दोनच दिवस शिल्लक असून निकालाचं काऊंटडाऊनदेखील सुरु झालंय, असं मानलं जातंय.