हवामान कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना; WRI संस्थेचे नियोजन
मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून हवामानात प्रचंड बदल होत आहेत. त्यामुळे शेतीवर आणि मानवी शरीरावरही परिणाम होत आहेत. बदलत्या हवामानाचा रोख समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी हवामान कृती आराखडा तयार केला जातो. तसेच प्रत्येक शहरासाठी प्रदूषण नियंत्रणाकरिता हवामान कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार,WRI या संस्थेकडून औरंगाबादमधील हवामान कृती आराखडा २०२३ पर्यंत तयार करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
हवामान कृती आराखडा चार टप्प्यांमध्ये तयार कऱण्यात येणार आहे. यासाठी सर्व शासकीय विभागाकडून आवश्यक माहिती गोळा करण्यात येईल. यात पाणीपुरवठा, विद्युत मंडळ, वन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी ते मार्च पर्यंत संबंधित विभागांकडून पाण्याचा वापर, वाहनांची संख्या, घनकचरा व्यवस्थापन आदी माहिती गोळा केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात एप्रिल ते जूनपर्यंत नकाशा तयार करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात लोकसहभाग वाढवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा समावेश करण्यात येईल. अंतिम टप्प्यात सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत कृती आराखडा अंतिम करण्यात येईल. त्यानंतर प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने वीजेचा वापर कमी करून ग्रीन बिल्डिंगला प्रोत्साहन देणे, सामूहिक वाहतुकीचा वापर, सायकलचा जास्त वापर यावरही भर देण्यात येणार आहे.
औरंगाबाद शहराचा हवामान कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात स्मार्ट सिटी मुख्यालयात वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेच्या सदस्यांची मनपा प्रशासक, प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. याअंतर्गत लोकसहभागातून शहरात होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच हवामान बदलामुळे होणारे नुकसान कमी करण्याच्या विविध प्रमुख मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. चक्री वादळ, अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाची परिस्थिती कमी करणे याविषयी काय उपाययोजना राबवता येतील, यावर सखोल चर्चा झाली.