सावधान! अवकाळीचं सावट अजून संपलं नाही, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना ‘हे’ दिवस काळजी घ्या!
राज्यात होळी (Holi) आणि धुळवडीदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 5 ते 8 मार्च हे चार दिवस मराठवाडा, विदर्भासह कोकण किनारपट्टीवरील बहुतांश भागांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं. यामुळे काढणीस आलेल्या पिकंचं मोठं नुकसान झालं. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरु आहेत.   सध्या औरंगाबाद, जालना, परभणीसह विदर्भातील वाशिम, नंदुरबार, आदी भागात स्वच्छ सूर्यप्रकाश दिसून येत आहे. त्यामुळे अवकाळीचं सावट दूर गेलंय, असं वाटतंय. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांनी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या सरी कोसळू शकतात. प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने नवा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
13, 14 मार्च रोजी पावसाची शक्यता
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 13 मार्ज रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तर दिनांक 14 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हा प्रभाव दिसून येईल.   मराठवाड्यात साधारण १६ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहिल.
23 मार्चपर्यंत तापमानात घसरण
सॅक, इस्रो अहमदाबाद यांच्याद्वारे जारी केलेल्या उपग्रह छायाचित्रांवरून सदर अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिनांक 17 ते 23 मार्च या कालावधीत पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच 22 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दरम्यान देखील मराठवाड्यात तापमान घसरलेलेच दिसून येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.