Big Breaking | संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, BJP आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप, काय आहे प्रकरण?
मुंबई: हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), सदानंद कदम (Sadanand kadam) यांच्याविरोधातील कारवाईमुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजली असतानाच आता संजय राऊत यांनी आणखी एक प्रकरण समोर आणलं आहे. भाजप आमदार राहुल कुल यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. भीमा सहकारी साखर कारखाना हा पुणे जिल्ह्यातील दौंड येथे आहे. राऊत यांनी यासंदर्भात फडणवीस यांना भलं मोठं पत्र लिहिलंय. हा भ्रष्टाचार नेमका कसा झाला, याचा घटनाक्रमही त्यांनी पत्रात लिहिलाय. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं असून ते आता भाजप नेत्यांची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
काय आहेत नेमके आरोप?
पुण्यातील दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात तब्बल ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. ‘कारखान्यात ५०० कोटी रुपयांचे मनी लाँडरींग झाले आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींच्या गैरव्यवहार त्यापेक्षाही भयंकर आहे. या भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे, असा इशारा या पत्रातून देण्यात आलाय.