नवी मुंबईत बिहार स्टाईल हत्याकांड, बाईकवरून आले, अंधाधूंद गोळ्या झाडल्या अन् पसार झाले; अनेकांसमोरच बिल्डरची हत्या
नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ परिसरात काल एका बिल्डरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. दोन इसम बाईकवरून आले. अन् कारमध्ये बसलेल्या बिल्डरवर अंधाधूंदपणे गोळ्या झाडून पसार झाले. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बिल्डरचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे असंख्य लोकांसमोरच या बिल्डरची हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ज्या राजरोसपणे हत्या केल्या जातात तसाच प्रकार घडल्याने नवी मुंबईत दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
सावजीभाई पटेल असं या बिल्डरचं नाव आहे. नेरूळच्या सेक्टर सहामध्ये ही घटना घडली. काल संध्याकाळी पावणे पाच वाजता पोलीस कंट्रोल रुमला हत्या झाल्याचा फोन आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यानी दिलेले माहितीनुसार दुपारी साडेचार ते पावणे पाचच्या सुमारास ही हत्या झाली. हा बिल्डर कारमध्ये बसलेला असतानाच दोन तरुण बाईकवर आले आणि त्यांनी बिल्डरला गोळ्या घातल्या आणि पसार झाले. यावेळी या परिसरात अनेक लोक होते. या लोकांनी नेमकं काय घडलं याची माहिती पोलिसांना दिली.
कारमध्ये बॉडी मिळाली
पोलिसांना कारमध्ये सावजीभाई पटेल यांची बॉडी मिळाली आहे. पटेल यांना गोळ्या घातल्याचं निष्पन्न झालं आहे. कारमध्ये तीन निकामी काडतुसेही मिळाली आहेत. पोलिसांनी पंचनामा तयार केला आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक छडा लावण्यासाठी पोलीस पटेल यांच्या कुटुंबीयांचाही जबाब घेत आहेत. पटेल यांना कुणाच्या धमक्या आल्या होत्या का? अलिकडच्या काळात त्यांचं कुणाशी भांडण झालं होतं का? काही वाद होते का? आदी मुद्द्यांवरून घटनेचा तपास केला जात आहे. तसेच या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही पोलीस तपासणार असल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
जमिनीच्या वादातून हत्या?
सावजीभाई पटेल हे रिअल इस्टेटशी संबंधित आहेत. जमिनीच्या वादातून पटेल यांची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस त्यानुषंगानेही तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.