नवी मुंबईतील नगरसेवकासाठी इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली; मंगळवारी प्रभाग रचना होणार जाहीर?
कोरोनामुळे अधिक काळ लांबलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नवी मुंबई महानगर पालिकेची प्रभाग रचना मंगळवारी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.    त्यामुळे बऱ्याच काळापासून नवी मुंबईकरांची लांबलेली प्रतीक्षा संपणार आहे. प्रभाग रचना जाहीर होताच निवडणूक लागण्याची शक्यता  देखील व्यक्त होत आहे.    त्यामुळे अंदाजे एप्रिल महिन्यात  निवडणुकीची धामधूम पाहायला मिळणार असे दिसत आहे.  त्यामुळे माजी १११ नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आता जनतेच्या सेवेसाठी जागे होणार असल्याचे दिसते.
नवी मुंबई महानगर पालिका नगरसेवकांची संख्या १११ वरून १२२ होणार आहे. तर नगरसेवकांची संख्या वाढल्याने प्रभाग रचना बदलणार आहे. नवीन प्रभाग रचनेबाबत सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता असून लवकरच नवीन प्रभाग रचनेची प्रतीक्षाहि संपणार आहे. मात्र नगरसेवकांच्या वाढीमुळे प्रभाग रचना नक्की कशी बदलणार हे आताच सांगणे कठीण आहे. तर माजी नागसेवकांसह इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. या प्रभाग रचनेतून काहींची डोके दुखी वाढणार तर काहीजण सुरक्षित होणार असल्याचे दिसत आहे.
तर आता नगरसेवक आणि समाजसेवकांना जनतेची आठवण येणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रभागात आता विविध कार्यक्रमांचे नियोजन सुरु होईल. तुमच्या सोसायटी अपार्टमेंटमध्ये धुरीकरण, मास्क तसेच सॅनिटायझर वाटपाला सुरुवात होणार असल्याचे दिसत आहे. तुमच्यासाठी काही मोफत प्रशिक्षण अथवा कार्ड वाटप सुरु करून त्या माध्यमातून तुमचे संपर्क मिळवले जातील. सामाजिक माध्यमांचा वापर करून त्यावर तुम्हाला मेसेज पाठवून प्रचार केला जाईल. तसेच मतदान करण्याचे आवाहन केले जाईल. तिळगुळ समारंभ करून महिलांना वाण देण्यास पुढाकार घेतला जाईल. पैठणी कार्यक्रम राबवण्याची शक्यता अधिक असेल. हि सर्व प्रलोभने देऊन मतदारांना विकत घेण्याच्या प्रयत्न होणार असल्याने नागरिकांनी सजग होण्याचे दिवस आले आहेत. तरी आपला स्वाभिमान आणि मत विकणाऱ्यांसाठी पाच वर्षांनी आलेली संधी असणार आहे.