6000 किलो गुलाब पाकळ्या, 2 किलोमीटर रस्त्यावर अंथरल्या, कुणाचं झालं जंगी स्वागत?
6000 किलो गुलाब पाकळ्या, 2 किलोमीटर रस्त्यावर अंथरल्या, कुणाचं झालं जंगी स्वागत?
नेत्याच्या स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते आणि समर्थक काय काय मार्ग अवलंबतात, याचे अनेक दाखले राजकारणात आहेत. कुणी १०० किलोचा हार नेत्याच्या गळ्यात घालतात तर क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करतात. छत्तीसगडमध्ये नुकतंच असं एका नेत्याचं स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी तब्बल २ किलोमीटरच्या रस्त्यावर गुलाबांच्या पाकळ्याच अंथरल्या. तब्बल ६००० किलो गुलाबांच्या पाकळ्या यासाठी वापरण्यात आल्या. सोशल मीडियावर सध्या या स्वागताची जोरदार चर्चा आहे. छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या ठिकाणी आज प्रियंका गांधी यांनी हजेरी लावली. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही जय्यत तयारी केली.
प्रियंका गांधी यांचं जंगी स्वागत
आज शनिवारी काँग्रेसच्या ८५ व्या तीन दिवसीय महाअधिवेशनात प्रियंका गांधी वढेरा यांनी हजेरी लावली. सकाळी ८.३० वाजताच त्या रायपूर विमानतळावर पोहोचल्या. विमानतळासमोरील रस्त्यावर या सुंदर गुलाब पाकळ्यांनी त्यांचं स्वागत करण्यात आलं. प्रियंका गांधींचा रस्ता सजवण्यासाठी जवळपास ६ हजार किलो फुलांचा वापर करण्यात आला. यासोबतच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रंगीबेरंगी पारंपरिक वस्त्र परिधान केलेल्या कलाकारांनी कला सादर केल्या.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, छत्तीसगडचे काँग्रेस प्रमुख मोहन मरकाम आणि इतर नेत्यांनी प्रियंका गांधी यांचं स्वागत केलं. या स्वागतानंतर मुख्यमंत्री बघेल यांच्यासोबत प्रियंका गांधी एका कारमध्ये पुढे गेल्या. जागोजागी उभ्या असलेल्या समर्थकांनी प्रियंका गांधी यांचं स्वागत केलं. मागील सीटवर बसलेल्या मुख्यमंत्री बघेल यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून त्यांचा उत्साह वाढवला. कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतरही प्रियंका गांधी यांच्यावर गुलाबांची पुष्पवृष्टी करण्यात आली.