Breaking: संदीप देशपांडे यांचा हल्लेखोर ठाकरे गटाचा पदाधिकारी? राजकीय हेतुनेच हल्ल्याचा दाट संशय, मोठी माहिती समोर!
मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे   यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती ठाकरे गटाची असल्याची मोठी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज सकाळीच पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींनी दिलेल्या कबुलीनंतर मोठी माहिती समोर आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेला हल्ला हा राजकीय हेतुनेच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्याच वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून आता या गोष्टीला दुजोरा मिळण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आज भांडुप परिसरातून दोन जणांना ताब्यात घेतलं. यापैकी एकाची ओळख पटली आहे. एकाचं नाव अशोख खरात आहे. तो शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माथाडी संघटनेचा उपाध्यक्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अशोक खरात हा भांडुप परिसरातील कोकण नगरात राहतो. त्याच्याबरोबर सोळंखी नावाचा आणखी एक सहकारी होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
नेमका कुणाचा हात?
हा हल्ला राजकीय हेतुनेच झाल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हल्ला प्रकरणी पकडण्यात आलेली व्यक्ती ठाकरे गटाशी संबंधित असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे हा संशय अधिक बळावला आहे. काल भाजप आणि मनसे नेत्यांनीही ही भीती व्यक्त केली होती. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करीत आहेत.