मंत्रालयात वेगाने हालचाली, जुन्या फायली काढल्या जाताहेत, सरकार जाणार? नाना पटोले यांचं सूचक वक्तव्य काय?
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. तब्बल नऊ महिन्याच्या युक्तिवादानंतर ही सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. हा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे. मात्र, निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. निकाल काहीही येऊ शकत असल्याने निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, याच दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. सरकार जात असताना जशी मंत्रालयात हालचाली सुरू असतात तशीच हालचाल सध्या मंत्रालयात पाहायला मिळत आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
नाना पटोले यांनी पत्रकाराशी संवाद साधताना हे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक ही शेवटची आहे की नाही हे सांगता येणार नाही. कारण जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही. तोपर्यंत त्यावर काही बोलणं योग्य नाही. पण आमचे लोक जे सांगत आहेत ते महत्त्वाचं आहे. मंत्रालयात लगबग वाढली आहे. जुन्या फायली पटापट काढल्या जात आहेत, असं आमचे लोक सांगत आहेत. कदाचित सत्ताधाऱ्यांना काही चाहूल लागली असावी. त्यामुळे मंत्रालयात लगबग सुरू असल्याचा सीन आहे. याचा अर्थ काही ना काही गडबड आहे, असं सूचक विधान नाना पटोले यांनी केलं आहे.