ईरान–इजराइल युद्धाचा कांदा व्यापारावर फटका; JNPA मधील 6 कंटेनर APMC मध्ये, दर कोसळून 9 रुपये किलो
नवी मुंबई :आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता कांद्याच्या व्यापारावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. निर्यातीसाठी पाठविण्यात आलेले कांद्याचे कंटेनर दीर्घकाळ बंदरात अडकून राहिल्यानंतर अखेर JNPA पोर्टमधील ६ कंटेनर मुंबई APMC कांदा-बटाटा घाऊक बाजारात विक्रीसाठी दाखल झाले. या कांद्याला बाजारात अवघा ९ रुपये प्रति किलो दर मिळाल्याने निर्यातदार आणि कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
निर्यातीसाठी तयार करण्यात आलेला हा कांदा दुबई आणि इतर आखाती देशांकडे पाठविण्यात येणार होता. मात्र युद्धामुळे काही देशांमधील व्यापार आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने हा माल बंदरातच अडकून पडला. अखेर निर्यात होण्याची शक्यता कमी झाल्याने हा कांदा स्थानिक बाजारात विक्रीसाठी आणण्यात आला.
प्रत्येकी सुमारे ३० टन वजनाचे ६ कंटेनर, म्हणजेच जवळपास १८० टन कांदा, आज मुंबई APMC कांदा-बटाटा घाऊक बाजारात दाखल झाला. हा कांदा जवळपास आठ दिवस JNPA बंदरात अडकून होता. त्यामुळे खराब होण्याची भीती निर्माण झाल्याने निर्यातदारांनी तो स्थानिक बाजारात विकण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, स्थानिक बाजारात आज कांद्याचा सरासरी दर सुमारे १३ रुपये प्रति किलो होता. मात्र निर्यातीचा दर्जेदार कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात आल्याने त्याची विक्री ९ रुपये किलो दराने करावी लागली. त्यामुळे बाजारातील दरांवरही दबाव निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, नाशिक परिसरातून निर्यातीसाठी खरेदी करण्यात आलेला हा कांदा परदेशी बाजारात १०० ते १५० रुपये प्रति किलो दराने विकला जाणार होता. मात्र निर्यात ठप्प झाल्याने तोच कांदा आज स्थानिक घाऊक बाजारात कवडीमोल दराने विकावा लागत आहे.
भारताचा कांदा निर्यात व्यवसाय मोठ्या प्रमाणात आखाती देशांवर अवलंबून असल्याने युद्धजन्य परिस्थिती कायम राहिल्यास निर्यातदारांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.