सोयाबीन दर अखेर ६ हजारावर स्थिर; व्यापाऱ्यांना उन्हाळी सोयाबीनची प्रतीक्षा
तीन महिन्यापूर्वी खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल झाले होते. मुहूर्ताच्या सोयाबीन तब्बल ११ हजार रुपये क्विंटलचा दर हा राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये देण्यात आला होता. त्यानंतर सुरु झालेला चढ-उतार आता हंगामाच्या अंतिम टप्प्यातही सुरुच आहे. उत्पादनात झालेली घट आणि होत असलेली मागणी याचा ताळमेळ साधतच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली होती. शेतकऱ्यांच्या या सावध भूमिकेमुळे मात्र, दर हे टिकून राहिले होते. त्यामुळे उत्पादनात झालेल्या घटीची कसर वाढीव दरामध्ये भरुन निघाली होती. परंतू हे दर कधीच टिकून राहिले नाहीत. सातत्याने होत असलेल्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना आपली भूमिका ही बदलावी लागली होती. सध्या खरीपातील साठवणूक केलेले सोयाबीन अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घटत आहेत. मात्र, घटते दर आणि भविष्यात उन्हाळी सोयाबीनची होणारी आवक यामुळे दर अणखीनच घटतील त्यामुळे अधिकचे काळ साठवणूक न करता आता सोयाबीन विक्री वर शेतकऱ्यांचा भर आहे. कारण ६ हजार दर असतानाही लातूर कृषी उत्पन्न् बाजार समितीमध्ये तब्बल २४ हजार पोत्यांची आवक झाली आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या भूमिकेवरच सोयाबीनचे दर अवलंबून होते. कारण उत्पादनात घट झाल्याने मागणी वाढणार याची कल्पना शेतकऱ्यांना होतीच. त्यामुळे दर वाढले की टप्प्याटप्प्याने विक्री आणि कमी झाले की साठवणूक हे गणितच शेतकऱ्यांनी ठरवून घेतले होते. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून दर हे टिकून होते. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात दर हे घसरले आहेत. शिवाय जागतिक बाजारपेठेतली मागणीही घटलेली आहे. तर दुसरीकडे सोयाबीनची साठवणूक करावी तर उन्हळी हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाली तर ते दरही घसरतील अशी स्थिती आहे. त्यामुळे आहे त्या दरात सोयाबीनची विक्री यावरच शेतकऱ्यांचा भर आहे.
जानेवारी महिन्याच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरात चांगली वाढ झाली होती. ६ हजार प्रति क्विंटलवरील सोयाबीन हे ६ हजार ५०० येऊन ठेपले होते. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना यामध्ये अणखीन वाढ व्हावी अशी अपेक्षा होती. मात्र, झाले उलटेच आता दिवसेंदिवस सोयाबीनच्या दरात घट होत आहे. त्यामुळे पुन्हा सोयाबीन ६ हजारावर येऊन ठेपले आहे. शिवाय आता दर वाढीबाबत आशादायी चित्र नाही. त्यामुळे संपूर्णच सोयाबीनची साठवणूक न करता विक्री केली तरच फायद्याचे राहणार आहे. यंदाच्या हंगामात ४ हजार ५०० ते ६ हजार ५०० या दरम्यानच सोयाबीनचे दर राहिले होते.