नवी मुंबईत भाजपाला सुरुंग; ११ माजी नगरसेवकांचा लवकरच इतर पक्षात प्रवेश !
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले असून पक्ष बांधणी आणि निवडणूक व्यूहरचना सुरु आहेत. तर नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत महापालिकेसाठी आघाडी निश्चित झाली असून लवकरच जागा वाटप होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बैठकीला नेरुळ, तुर्भे आणि ऐरोली परिसरातील भाजपचे ११ नगरसेवक देखील उपस्थित राहिले असून हे नगरसेवक आघाडीच्या वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पूर्वी झालेल्या बैठकांमध्ये त्यांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा पार पडल्या असून प्रभागरचना जाहीर होताच हे नगरसेवक भाजपाला सोडचिठ्ठी देणार आहेत.
या पूर्वी भाजपमधून काही नगरसेवक राष्ट्रवादीसह इतर पक्षात गेले होते. आता पुन्हा ११ नगरसेवक विविध पक्षात प्रवेश करणार असल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सुरुंग लागणार आहे. सध्या भाजप ५६, शिवसेना ४४, राष्ट्रवादी ५ आणि काँग्रेस ६ असे पक्षीय बलाबल आहे. तर राष्ट्रवादी पक्षात ५ ते ६ नगरसेवक येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी दिली. मात्र उलट भाजपमध्येच ५ ते ६ नगरसेवक येणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सांगितले. तर कोणत्या पक्षात किती नगरसेवक कोणत्या पक्षातून येणार आणि जाणार हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे.