मुंबई APMC मार्केट कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने; दोन दिवसात १०० जण बाधित
नवी मुंबई शहरात कोरोनाचा विस्फोट सुरु आहे. कालच्या पालिका अहवालनुसार २ हजार १५१ रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत. तर नवी मुंबईत प्रतिदिन जवळपास १४ हजार चाचण्या केल्या जात असून सध्या शहरात ४ हजार ६८५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस नवी मुंबईच्या चिंतेत भर पडत आहे. राज्य शासनाकडून सातत्याने इशारा दिला जात असून सुद्धा स्थानिक प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
तर मुंबई एपीएमसी मार्केटने रुग्णवाढीच्या दिशेने झपाट्याने पाऊले टाकण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसात पाचही मार्केटमध्ये जवळपास १२०० कोरोना तपासण्या पार पडल्या, त्यात १०२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. म्हणजेच जवळपास तपासण्याच्या सरासरी १० टक्के रुग्णबाधित मिळून आले आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये निर्बंध कडक करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.  सध्या शहरातल्या प्रत्येक दवाखान्यासमोर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक घरात सध्या सर्दी, ताप, अंगदुखीचे रुग्ण आढळत आहेत. हे सगळं व्हायरल इन्फेक्शन असल्याचं जरी सांगितलं जात असलं, तरी या सगळ्यांची टेस्ट केली, तर अर्ध्यापेक्षा जास्त जण कोरोना पॉझिटिव्ह येतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मसाला मार्केटमध्ये 200 जणांची कोरोना चाचणी झाली असून एका दिवसात १३ तर दोन दिवसात २६ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.  धान्य मार्केटमध्ये ३५५ चाचण्यांमध्ये दोन दिवसात १४ रुग्ण, फळ मार्केटमध्ये २९७ चाचण्यांमध्ये दोन दिवसात १० रुग्ण, भाजीपाला मार्केटमध्ये २०४ चाचण्यांमध्ये दोन दिवसात ३८ रुग्ण तर कांदा बटाटा मार्केट १५६ चाचण्यांमध्ये दोन दिवसात १५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. शिवाय यात मोठ्या प्रमाणात कामगार आणि ग्राहकांचा समावेश आहे.
त्यामुळे बाजार समितीमध्ये होत असलेल्या कोरोना नियमांची पायमल्ली नवी मुंबईला घातक ठरणार असल्याचे दिसत आहे. शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाणही वाढत असून नागरिकांनी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व गर्दीमध्ये मिसळणे टाळले पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे. 
– देशात 1 लाख 17 हजार 100 रुग्ण
– आतापर्यंत देशात 3 कोटी 52 लाख 26 हजार 386 कोरोनाबाधित रुग्ण
– सक्रीय रुग्णांची संख्या देशात 3 लाख 71 हजार
– भारतात मागील 24 तासात 302 रुग्णांचा मृत्यू
– भारतातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 97.57 टक्के 
- महाराष्ट्रात- 36 हजार 235