सायन-पनवेल महामार्गा उजाळणार; दिवाबत्ती नवी मुंबई महापालिकेकडे
सायन-पनवेल महामार्गावरील दिवाबतीची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेकडे हस्तांतर केली आहे. हस्तांतरित करण्यापूर्वी दुरुस्तीसाठी ८ कोटी २९ लाख रुपये निधी मनपाला देण्यात आला आहे. महामार्गावरील ४ भुयारी मार्गांच्या देखभालीची जबाबदारीही मनपाकडे देण्यात आली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या रस्त्यांमध्ये सायन-पनवेल महामार्गाचा समावेश आहे. शासनाने जवळपास १२०० कोटी रुपये खर्च करून महामार्गाचे रुंदीकरण केले आहे. पण दिवाबत्ती व भुयारी मार्गांच्या देखभालीकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने महामार्गाची निळा झाकळू लागली होती. शिवाय अंधारामुळे महामार्गावर नियमित अपघात होत असतात. भुयारी मार्ग सुरु नसल्यामुळेही पादचाऱ्यांची गैरसोय होत असते. मोठ्या जिकिरीचे रस्ता ओलांडावा लागत आहे. महामार्ग देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्यामुळे त्याच्या देखभालीसाठी मनपाला खर्च करता येत नव्हता. महामार्गाची योग्य देखभाल होत नसल्यामुळे स्वच्छता अभियानाच्या कामगिरीवरही परिणाम होऊ लागला होता. यामुळे महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी केली होती. या मागणीची दखल जबाबदारी घेण्याची तयारी केली होती. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. शासनस्तरावर अनेक बैठकाही घेण्यात आल्या होत्या. वाशी टोल नाका ते कोकण भवनपर्यंत पथदिव्यांच्या देखभालीची जबाबदारी यावी यासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबरला दोन्ही प्राधिकरणाच्या वतीने संयुक्त पाहणीही करण्यात आली होती बांधकाम विभागाने हस्तांतरणाला हिरवा कंदील दाखविला आहे. वाशी टोल नाका ते कोकण भवनपर्यंतचे पथदिवे ट्रान्सफॉर्मर विद्युत यंत्रणा, विद्युत मीटर महानगरपालिकेकडे हस्तांतर केल्या आहेत. यापूर्वी दुरुस्तीकरिता लागणारे अंदाजपत्रक बांधकाम विभागाला दिले होते. विद्युत विभागाने पडताळणी करून मनपाला ८ कोटी २९ लाख रुपये दिले आहेत. याशिवाय चार भुयारी मार्गाची जबाबदारीही मनपाकडे दिली आहे.
महामार्गावरील नेरुळमधील दोन पादचारी भुयारी मार्ग, एसबीआय कॉलनीसह चार पादचारी भुयारी मार्गाच्या देखभालीची जबाबदारीही मनपाने घेतली आहे. त्याठिकाणी असलेल्या गैरसोयीची सुविधा देखील महापालिका करणार आहे. यामुळे लवकरच भुयारी मार्ग नागरिकासाठी खुले होऊ शकणार आहेत.
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सायन -पनवेल महामार्गावरील पथदिव्याचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मागी लागला आहे. यापुढे महामार्ग कायमस्वरूपी प्रकाशमान राहणार आहे.
अभिजीत बांगर, आयुक्त महानगरपालिका