सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला प्रश्न, आमदार अपात्र ठरले असते तर राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली असती का?

सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला प्रश्न, आमदार अपात्र ठरले असते तर राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली असती का?
नई दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं (Maharashtra Political crisis) नाट्य लवकरच संपण्याची शक्यता वर्तवली जात असली तरीही आज सुप्रीम कोर्टातील (Supreme court) युक्तिवादातून अनेक मुद्दे समोर आले. आजची सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली. उद्या पुन्हा शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल. एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी पक्षफुटीचा 10 व्या परिशिष्टाचा नियम आम्हाला लागू होत नाही, यासंदर्भाने जोरदार युक्तिवाद केला. तर सुप्रीम कोर्टाने नीरज कौल यांना विचारलेल्या प्रश्नावरून जोरदार चर्चा सुरु आहे. आमदार अपात्र ठरले असते तर राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवली असती का, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. यावरून नीरज कौल यांनी उत्तर दिलं की, हे सर्व गृहितकांवर बोललं जातंय, असं ते म्हणालेत. यावर आम्ही फक्त गृहितकांवर बोलत नाहीयेत. जे घडलंय ते सर्वांना माहिती आहे, असं वक्तव्य सरन्यायाधीशांनी केलंय.
अर्थात ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला तेव्हादेखील सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नांवरून काही तर्क लावता येणार नाहीत, असं स्पष्टीकरण कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिलंय.
’10 व्या परिशिष्टावरून घमासान’
सुप्रीम कोर्टात 10 व्या परिशिष्टावरून पक्षफुटीसंदर्भात नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले. 2 जूनला महाराष्ट्रात जे नाट्य घडलं, त्यावेळी दोन व्हिप जारी करण्यात आले. ठाकरे आणि शिंदे गट असे दोन्हीकडून व्हिप जारी करण्यात आले. त्यामुळे अधिकृत व्हिप कुणाचा मानयचा? हा प्रश्न आज सुप्रीम कोर्टातील युक्तिवादादरम्यान उपस्थित झाला. 10 व्या परिशिष्टानुसार एखाद्या पक्षाचा व्हिप आमदाराने पाळला नाही तर तो अपात्र ठरतो. पण हा प्रतोद नेमका कोण निवडू शकतो, असा मुद्दा आज उपस्थित झाला. पक्षातर्फे त्याची नेमणूक केली जावी की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे त्याची नेमणूक व्हावी, हा मुद्दा आज सुप्रीम कोर्टात उपस्थित झाला.