शेतकऱ्यांची पीक गेलं, राज्यकर्ते होळी, धुळवडीत गुंतले होते; अजित पवार यांची सडकून टीका*
मुंबई: राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात न आल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अजितदादांनी राज्य सरकारचे वाभाडेच काढले आहे. एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला मंत्री नसणे हे कमीपणाचं वाटतं. महाराष्ट्राच्या सरकारला ते शोभत नाही. मी तर अनेकदा जाहीर सभांमध्ये देखील आणि मीडियातही या गोष्टीचा उल्लेख केला. सभागृहातही उल्लेख केला. काय अडचण आहे माहीत नाही. ही गोष्ट आम्हालाही योग्य वाटत नाही. तमाम महिला वर्गालाही ती गोष्ट योग्य वाटत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी राज्यकर्त्यांना सुनावले आहे.
अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर चिंता व्यक्त केली. तसेच या प्रश्नावर विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिल्याचंही त्यांनी सांगितलं. 6 ते 9 तारखेपर्यंत काही भागात हवामान बदललं जाईल. त्यामुळे अवकाळी पाऊस येईल. वादळ येईल, गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला गेला होता. या अंदाजानुसारच घडत आहे. राज्यात अनेक भागात बळीराजाचं नुकसना झालं आहे. आंब्याचा मोहोर, संत्र्याच्या बागा, द्राक्ष, भाजीपाला, हरभरा, मका, कापूस, ज्वारी, कांदा या सर्वांचं नुकसान झालं आहे, असं अजित पवार म्हणाले.
अत्यंत वाईट परिस्थिती
काल मी पाथर्डी आणि नगरमध्ये होतो. तिथे काही लोकांनी मला निवेदने दिली. रस्त्याने प्रवास करताना मी शेतीचं झालेलं नुकसानही पाहत होतो. विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मागणी करणार आहोत. इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे की, शेतकऱ्यांचं पीक झोपलंय. त्यावर बळीराजा झोपलाय. बळीराजा मुस्काटीत मारून घेत आहे, अशी क्लिप फिरत आहे. सरकार काही मदत करणार नाही, असं त्यांना वाटत आहे, असं ते म्हणाले.