आठवडी बाजर बंदने शेतकरी त्रस्त; भाजीपाला फेकून देण्याची वेळ
कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम पार पडत आहेत. शिवाय आता बाजारपेठाही सर्व खुल्या आहेत. शाळाही सुरु झाल्या आहेत असे असतानाच आठवडी बाजारालाच का विरोध होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. भाजीपाला हा अत्यावश्यकमध्ये असतानाही याला विरोध होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहेत. राज्यात काही ठिकाणी आठवड्या बाजाराला परवानगी नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
यंदा वातावरणातील बदलामुळे शेती गणितच बिघडलेले आहे. खरिपातील पिकांचे अतिवृष्टीमुळे तर आता रब्बी हंगामातील पिकांचे अवकाळी आणि सततच्या वातावरणातील बदलामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. यामुळे मधला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली मात्र, त्यालाही कोरोनाचा अडसर ठरत आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही जिल्ह्यातील आठवडी बाजार हे बंद आहेत. त्यामुळे शेतात पिकलेलं विकावं कुठं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. असे असतानाही भाजीपाल्याच्या विक्रीतून चार पैसे मिळतील म्हणून मोठ धाडस करुन शेतकऱ्याने दूरचा आठवडी बाजाराचे ठिकाण गाठले पण मेथी खरेदीसाठी कोणीच फिरकले नाही. दिवसभर थांबून एक जुडीही विकली नाही म्हणून शेतकऱ्याने मेथीची भाजी चक्क रस्त्यावर फेकणेच पसंत केले. त्रस्त शेतकरी मेथीच्या जुड्या भिरकावून टाकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या आठवडी बाजार हे बंद आहेत. त्यामुळे भाजीपाला विक्री करायचा कुठे हा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. व्यापारी कवडीमोल दरात खरेदी करतात. त्यामुळे शेतकरी प्रशासनाचा विरोध असतानाही विक्रीसाठी दाखल होत आहे. असाच प्रकार बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये घडला होता. शेतकऱ्यास भाजी विक्रीसाठी बसू दिले नसल्याने त्याने सर्व भाजीपाला हवेत भिरकावून दिला होता. तर आता लातून जिल्ह्यातील किनगाव येथे हा प्रकार समोर आला आहे. तीन महिने कष्टाने फुलवलेली मेथी अशाप्रकारे फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढावली आहे.