‘अब की बार किसान सरकार’ तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं चाललंय काय? राजू शेट्टी, शंकर अण्णा धोंडगेंसह शेतकरी नेत्यांच्या गाठीभेठी, राजकीय चर्चांना उधाण
'अब की बार किसान सरकार' चा नारा देत शेतकरी नेत्यांशी केसीआर यांनी साधलेली जवळीक म्हणजे भाजपच्या विरोधातील नेत्यांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानल्या जात आहे.
तेलंगणा (Telangana) राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव (Chandrashekhar rao) सध्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील बड्या शेतकरी नेत्यांच्या गाठी-भेटी सुरु केल्याची माहिती   समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधारचे माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांना केसीआर यांनी हैद्राबादला बोलावून त्यांच्याशी तब्बल ३ तास चर्चा केलीय. धोंडगे सोबतच केसीआर यांची राज्यातील राजू शेट्टी, वामनराव चटप , रघुनाथ दादा पाटील यासह अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्याची माहिती मिळतेय. ‘अब की बार किसान सरकार’ चा नारा देत शेतकरी नेत्यांशी केसीआर यांनी साधलेली जवळीक म्हणजे भाजपच्या विरोधातील नेत्यांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानल्या जात आहे.
तेलंगणातील योजनांचं आकर्षण?
शंकर अण्णा धोंडगे हे शेतकरी संघटनेतील मोठे नाव आहे. किसानभारती नावाची स्वतंत्र संघटना त्यांनी काढली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळावर ते नांदेड जिल्ह्यातील लोहा- कंधार मधून ते विधानसभेत पोहोचले होते. याच धोंडगे यांनी हैद्राबाद मध्ये जाऊन केसीआर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलय. तेलंगणा राज्य सरकार चोवीस तास शेतकऱ्यांना मोफत विद्युत पुरवठा देत, त्याच बरोबर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या अनेक योजना ते सरकार त्यांच्या राबवत आहे. नेमकं हे कसं साध्य केलं याबाबत आपण केसीआर यांच्याशी चर्चा केल्याचे धोंडगे यांनी सांगितले. ह्या लोककल्याणकारी योजना राबवताना तेलंगणा सरकार राबवू शकते तर मग आपल्या राज्यात तशी मागणी करता येऊ शकते का, याची आपण चाचपणी केल्याचे धोंडगे यांनी सांगितले.
‘अब की बार किसान सरकार’ चा नारा
शेतकरी हा केंद्रबिंदू मानत केसीआर गेली दहा वर्षे तेलंगणा राज्याची धुरा सांभाळत आहेत, आता त्यांनी त्यांच्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समिती हे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे नामकरण केलय. पक्ष विस्तारासाठी त्यांनी पहिली सभा नांदेडमध्ये घेतली होती. त्यांच्या सभेला जमलेली गर्दी पाहून केसीआर यांना मोठे प्रोत्साहन मिळालेलं दिसतय. त्यातून त्यांनी आता महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांना हैद्राबादला बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यास सुरुवात केलीय. महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांना बोलावून केसीआर महाराष्ट्रात आपलं स्थान निर्माण करू शकतात का हे पाहण औत्त्सुक्याचं ठरणार आहे.
राजकीय चर्चांना उधाण
केसीआर यांची भेट घेतल्या नंतर शंकर अण्णा धोंडगे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी धोंडगे यांनी केसीआर हे शेतकरी हिताचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात यश मिळवलंय. ते आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना देशभर राबवू पाहत आहेत आणि त्यासाठी त्यांनी राज्यातील शेतकरी नेत्यांशी संवाद साधला तर त्यात गैर काही नाही असे स्पष्टीकरण धोंडगे यांनी दिलय. भविष्यात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जर एकजूट होणार असेल तर त्यांना पाठबळ द्यायची वेळ आली तर सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल असेही धोंडगे बोलले. एरव्ही प्रसिद्धीपासून चार हाथ दूर असणारे शंकर अण्णा धोंडगे केसीआर यांच्याशी झालेल्या भेटीमुळे चर्चेत आलेत.