हजारो शेतकऱ्यांचा बाजार समितीत मुक्काम शेतकऱ्यांमध्ये रात्री हाणामारी
हरभरा नोंदणीसाठी तीन दिवसांपासून रांगा शेतकऱ्यांमध्ये रात्री हाणामारी
अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथे हमीभावाने हरभराच्या नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये रात्री हाणामारी झाली. हरभरा नोंदणीसाठी तीन दिवसांपासून चांदूर रेल्वेतही शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. हजारो शेतकऱ्यांचा बाजार समितीत मुक्काम आहे. आजपासून हरभरा विक्रीसाठी नोंदणी सुरू होणार आहे. पोलीस बंदोबस्तात हरभरा नोंदणी करण्यात आली. हरभरा पिकाची नोंदणी शासन किमान आधारभूत किमतीत म्हणजे हमीभावात करते. २०२२-२३ साठी ५,३३० रुपये प्रती क्विंटल हमीभाव मिळेल, असं सरकारनं जाहीर केलं. बाजारात यापेक्षा भाव कमी आहेत. त्यामुळे नोंदणी केल्यास जास्त भाव हरभरा उत्पादकाला मिळणार आहेत. त्यामुळे हरभरा उत्पादक नोंदणीसाठी गर्दी करत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवणे पोलिसांना कठीण जात आहे.
काही शेतकऱ्यांमध्ये वाद
तीन दिवसांपूर्वी नोंदणी केली जाणार असल्याचा शासकीय जीआर होता. त्यामुळे हरभरा विक्री करण्यासाठी नोंदणी करायला शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.परंतु, जीआर आमच्यापर्यंत पोहचला नाही. असं सांगून तीन दिवस उशिरा नोंदणी करण्यात आली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. रांगेत आमचा नंबर आधी लागावा. आम्ही आधी आलो. तुम्ही नंतर आले. यावरून रात्री काही शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. त्यात हाणामारी झाल्याची माहिती आहे. या शेतकऱ्यांनी चांदूर रेल्वेत गर्दी केल्याने ही परिस्थिती ओढावली.
दोन पैसे जास्त मिळणार असल्याने गर्दी
महाराष्ट्र राज्य सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागातर्फे हरभरा पिकाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले. आजपासून हरभरा पिकांची नोंदणी होणार आहे. त्यानंतर ते विक्री केले जाणार आहे. शासकीय आधारभूत किंमत शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते. दोन पैसे सरकार जास्त देत असल्याने ही गर्दी आहे. खासगी बाजारात भरभऱ्याचे भाव कमी आहेत. चांदूर रेल्वेत मोठ्या प्रमाणात शेतकरी आल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तरीही शेतकऱ्यांची गर्दी काही कमी होताना दिसत नाही. योग्य पद्धतीने ही परिस्थिती हाताळणे आवश्यक आहे. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते.