अंतिम टप्प्यात गूळ दरात वाढ आवक निम्म्यावर
हंगाम अखेरीस गूळदरात वाढ
क्विंटलला २०० ते ३०० रुपये वाढले आवक मंदावली
कोल्हापूर: गुळ हंगामाच्या अंतिम टप्प्यात गुळाच्या दरात   क्विंटलला २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या उसाबरोबरच गुळ हंगामही शेवटच्या टप्प्यात आला आहे. हंगाम संपत आल्याने व उसाची कमतरता असल्याने गुळाची   चणचण लक्षात घेता व्यापारी गूळ खरेदीला प्राधान्य देत आहेत. शिवारात गुळासाठी ऊस शिल्लक नसल्याने गुऱ्हाळे ही जलदगतीने बंद होत आहेत. याचा परिणाम गूळ निर्मितीवरही होत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात गुळाची आवक मंदावली आहे.   कोल्हापूर बाजार समितीत गुळास दर्जानुसार ३९०० ते ४२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
बाजार समितीत पाच ते सात हजार गूळ रवे येत आहेत. ही आवक दैनंदिन नसून एक दिवसा आडची आहे. दररोज सौदे होत नसल्याने उत्पादक ही सौदे होणाऱ्या दिवशीच गूळ बाजारात पाठवत आहेत.
गेल्या वर्षी वर्षभर हंगाम सुरू राहिला होता. यंदा मात्र पुरेसा ऊस शिवारात नसल्याने गेल्या वर्षा इतका नियमित हंगाम सुरू राहणार नसल्याची शक्यता आहे. 
राज्यातील गुळाला गुजरात येथील   बाजारपेठेचा मुख्य आधार आहे. कोल्हापूर बाजार समितीतून गूळ गुजरात ला जातो. सध्या गुळाची आवक कमी असली तरी गुजरातमधून मागणी थोडी वाढली आहे. फेब्रुवारीपर्यंत गुजरातचे व्यापारी आवश्यक इतकाच गूळ खरेदी करत होते. मात्र पुढे गूळ कमी तयार होण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी काही प्रमाणात खरेदी वाढवली आहे. या मुळे पुढील हंगामापर्यंत तरी दर चांगले राहतील, अशी शक्यता गूळ उद्योगाची आहे.