पशुसंवर्धन विभागासह मंत्री सुनील केदार यांचे शेतकऱ्यांना आवाहन
पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना साठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. या उपक्रमांच्या आणि योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक शेतकऱ्यांना हक्काचे रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे आणि लाभार्थी निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संगणक प्रणाली लागू करण्यात येत असून शासनाच्या एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेले प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षांपर्यंत वैध ठेवण्याची सोय केली आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांच्या माध्यमातून दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षांचा संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी आर्थिक मदत करणे, शंभर कुक्कुट पिल्लांचे वाटप व 253 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबवली जाणार आहे. या योजनांचा लाभ राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव आणि सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांनी घ्यावा व त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायची आवाहन सुद्धा पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.