भाकरी मातोश्रीची, चाकरी पवारांची, संजय राऊत महागद्दार, विधानसभेत कुणी केले गंभीर आरोप?
मुंबई | कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या गिरना अॅग्रो कंपनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विधानसभेतही याचे जोरदार पडसाद उमटले. दादा भुसे यांनी आज विधानसभेत या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. जगातली कोणतीही यंत्रणा लावून या आरोपांची चौकशी करा. मी दोषी ठरलो तर राजीनामा देईन. पण आरोप खोटे निघाले तर महागद्दार संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान दादा भुसे यांनी दिलंय. संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची चाकरी करतात, असा गंभीर आरोप दादा भुसे यांनी केला.
दादा भुसे काय म्हणाले?
शिंदेंची शिवसेना समर्थक दादा भुसे यांनी आज संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, हे आरोप खरे ठरले तर मी आमदारकी, मंत्रीपद सोडेन, राजकारणातूनही निवृत्त होईन. हे लोक आम्हाला गद्दार म्हणतात. पण आमच्याच मतावर हे महागद्दार निवडून आले आहेत. ते खोटे ठरले तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा.
चाकरी मातोश्रीची…
हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची, पवारांची करतात, असा आरोप दादाभुसे यांनी केलाय. यानंतर विधानसभेत एकच गदारोळ उठला. संजय राऊत यांनी मालेगावच्या नागरिकांची माफी मागावी. येत्या २६ तारखेपर्यंत मालेगावची माफी मागितली नाही तर शिवसैनिक गद्दारांना त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दादा भुसे यांनी दिला.
अजित पवारांचं उत्तर काय?
दादा भुसे यांच्या आरोपांवर अजित पवार यांनी सभागृहातच उत्तर दिलंय. शरद पवार यांचं नाव सभागृहात घेण्याचं काही कारण नव्हतं. सभागृहाच्या रेकॉर्डवरून हे काढून टाकण्याची मागणी अजित पवार यांनी केली.