सोयाबीनचा अजूनही तोरा कायम! दरात तेजीच....
धुलिवंदन आणि रंगपंचमी सणामुळे राज्यातील काही महत्वाच्या बाजार समित्या ह्या बंद होत्या. यामध्ये लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचाही सहभाग होता. सलग 5 दिवस व्यवहार बंद राहिल्याने बुधवारी शेतीमालाच्या दराच काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. विशेषत: खरिपातील सोयाबीन आणि रब्बी हंगामातील हरभरा या दोन पिकांचीच मोठी आवक सुरु आहे. मात्र, 5 दिवसानंतरही सोयाबीनच नव्हे तर हरभऱ्याचेही दर स्थिर होते. दर स्थिर असले तरी आवक मात्र काही प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता 7 हजार 250 हा सोयाबीनचा दर मान्य करुनच विक्रीला सुरवात केली आहे. गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनच्या दराबाबत अस्थिरता होती. त्यामुळे विक्री की साठवणूक हा मुद्दा कायम होता पण सोयाबीनचा दर शेतकऱ्यांनी मान्य करुन विक्रीला सुरवात केली आहे. टप्प्याटप्प्याने का होईना आता शेतकरी सोयाबीनची विक्री करु लागला आहे.
हरभऱ्याची आवक वाढली
रब्बी हंगामातील हरभऱ्याची मात्र, काढणी, मळणी की लागलीच विक्री हेच धोरण शेतकऱ्यांनी स्वीकारलेले आहे. यंदा हंगामात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झालेला आहे. त्यामुळे भविष्यात यापेक्षा आवक वाढून दरात घट होईल या धास्तीने शेतकरी लागलीच विक्री करीत आहे. खुल्या बाजारात हरभऱ्याला 4450 रुपये दर आहे तर हमीभाव केंद्रावर 5230 रुपये असे असतानाही खुल्या बाजारातच आवक जास्त आहे. खरेदी केंद्रावरील नियम-अटींमुळे शेतकरी बाजार समितीच जवळ करीत आहे. बुधावारी 5 दिवसानंतर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार सुरु झाल्यानंतर 30 हजार पोत्यांची आवक झाली होती.
शेतकऱ्यांना धास्ती उन्हाळी हंगामातील सोयाबीनची
यंदा केवळ खरिपातील बियाणे पदरी पडावे म्हणून नाही तर उत्पादन मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा केला आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे हे पीक बहरातही आहे. शिवाय काही भागामध्ये उन्हाळी हंगामातील सोयाबीनची आवकही सुरु झाली आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात आवक झाली तर दरावर परिणाम होईल म्हणून टप्प्याटप्प्याने का हाईना शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बुधवारी सोयाबीनची 20 हजार पोत्यांची आवक झाली होती.शिवाय भविष्यातही अशीच आवक राहणार असून शेतकऱ्यांना जो 10 हजार रुपये क्विंटल दर अपेक्षित होता त्याची अशा धुसर झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.