कल्याण APMC मध्ये महायुतीचा दणदणीत विजय! 18 पैकी 15 जागांवर कब्जा – महाविकास आघाडीला जोरदार धक्का!

नवी मुंबई : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीने प्रचंड वर्चस्व सिद्ध केलं आहे! एकूण १८ जागांपैकी तब्बल १५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी ठरले आहेत, तर महाविकास आघाडीला केवळ एक जागा, आणि दोन जागा अपक्षांच्या खात्यात गेल्या आहेत. ही निवडणूक यंदा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती.
राजकीय बड्या नेत्यांचा संपूर्ण जोर या निवडणुकीत पाहायला मिळाला आमदार किसन कथोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. दोन महिन्यांच्या जोरदार रणधुमाळीनंतर रविवारी मतदान पार पडलं आणि सोमवारी सकाळी मतमोजणीत निकाल जाहीर झाले.महायुतीच्या विजयी उमेदवारांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जल्लोष साजरा केला.फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि घोषणा याने बाजार समिती परिसर दुमदुमून गेला!
कोणत्याही परिस्थितीत कल्याण बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार व्यूहरचना केली होती. त्याप्रमाणे आपल्या प्रतिस्पर्धांना घरी बसवून महायुतीच्या उमेदवारांंनी अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत यश संपादन करून बाजार समितीत शिरकाव केला. रविवारी बाजार समितीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सोमवारी सकाळी मतमोजणी झाली.
सर्वसाधारण गटातून जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, कपील थळे, भरत गोंधळी, योगेश धुमाळ, अरूण पाटील, जालिंदर पाटील, मनोरमा पाटील विजयी झाले. महिला गटातून विद्या अरूण पाटील, शारदा हरिश्चंद्र पाटील विजयी झाले. इतर मागासवर्गिय गटातून वसंत लोणे,, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून रवींद्र आव्हाड विजयी झाले. ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून नरेश सुरोशी, रवींद्र भोईर, ग्रामपंचायत गटातून किशोर वाडेकर, आर्थिक दुर्बल गटातून विजय सुरोशी विजयी झाले. व्यापारी गटातून काशिनाथ नरवडे, गिरीश पाटील विजयी झाले. सर्वसाधारण कृषी, महिला गट, इतर मागास वर्ग, माथाडी, व्यापारी अडते, अनुसुचित जाती, ग्रामपंचायत, व्यापारी अशा विविध गटातून एकूण ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामधील १८ उमेदवार विजयी झाले.
कृषी बहुद्देशीय संस्थेच्या २४४ सदस्यांनी यावेळी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशाल जाधवर यांनी काम पाहिले. बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील, मधुकर मोहपे, शाहित मुल्ला, मोहन नाईक, भूषण जाधव पराभूत झाले. काही पराभूतांना दोन वर्षापूर्वी आमदार कथोरे यांच्या बरोबर केलेल्या कुरघोडीचा फटका बसला असल्याची चर्चा बाजार समितीत आहे. बाजार समितीची एकूण उलाढाल सुमारे ११० कोटीची आहे.