सोयाबीन दरवाढ सुरूच; 73.50 रुपये प्रतिकिलो
यंदा खरिपात उत्पादन कमी होऊन देखील शेतकऱ्यांना वाढीव उत्पन्न मिळावे ही आशा कायम आहे. आताच नाही तर हंगामाच्या सुरवातीपासून शेतकरी सोयाबीन दरवाढीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे पीक पदरात पडले की लागलीच विक्री न करता शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला होता. त्यामुळेच सध्याच्या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. असे असताना गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे दर हे 7 हजार 200 रुपायांवर स्थिरावले होते. गेल्या तीन दिवसांमध्ये सोयाबीन दरात सकारात्मक बदल होताना पाहवयास मिळत आहे. दिवसाकाठी 50 रुपयांची वाढ झाल्याने सोयाबीन हे 7 हजार 350 रुपयांवर पोहचले आहे. वाढीव दर पुन्हा शेतकऱ्यांना सभ्रमात टाकणारे आहेत. आता दरवाढ होणार नाही या भूमिकेतून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला सुरवात केली होती. पण थोड्याबहुत प्रमाणात का होईना दरात वाढ होऊ लागल्याने पुन्हा विक्री की साठवणूक हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतीमालाच्या वाढत्या दराचा परिणाम आवकवर
सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याच्या दरात थोड्याबहुत प्रमाणात का होईना वाढ झालेली आहे. तुरीला हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत अधिकचा दर आहे तर हंगामाच्या सुरवातीच्या तुलनेत आता हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली आहे. दरात वाढ झाल्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन 18 हजार पोते, हरभरा 35 हजार तर तुरीची आवक ही 18 हजार पोत्यांची झाली आहे. अखेर हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना बाजार समितीमध्ये रेलचेल निर्माण झाली आहे. सध्या या तीन शेतीमालाचीच अधिकची आवक आहे. सोयाबीन आणि तुरीची विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न अजूनही शेतकऱ्यांना संभ्रमात टाकत आहे.
असे वाढत गेले सोयाबीनचे दर
गत महिन्यात सोयाबीन 7 हजार 600 चा विक्रमी दर मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून 7 हजार 200 रुपयांवर सोयाबीन स्थिरावले होते. त्यामुळे पुन्हा आवक कमी झाली होती. या आठवड्यात मात्र, वाढीव दराबाबत सकारात्मक बदल होताना दिसत आहे. दिवसाकाठी 50 रुपयांची वाढ झाल्याने 7 हजार 200 वर असलेले सोयाबीन हे 7 हजार 350 वर येऊन ठेपले आहे. त्यामुळे पुन्हा सोयाबीनच्या दरातील बदलाने शेतकरी समाधानी राहणार की साठवणूकीवरच भर देणार हे पहावे लागणार आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरात होत असलेली सुधारणा ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.
मुख्य पिकांचे असे आहेत दर
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रामुख्याने सोयाबीन, तूर आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु आहे. तुरीला 6300 असा हमीभाव ठरवून देण्यात आला आहे पण खुल्या बाजारपेठेत 6 हजार 600 पर्यंत दर मिळू लागल्याने बाजार समितीमधील आवक ही वाढत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे 18 हजार पोत्यांची आवक मंगळवारी झाली आहे. दुसरीकडे 4 हजार 400 असलेला हरभरा आता 4 हजार 600 वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मंगळवारी 35 हजार पोत्यांची आवक झाली होती. वाढत्या दराचा परिणाम आवकवर होत आहे.