मुंबई APMCच्या पाचही मार्केटचा होणार पुनर्विकास? मसाला मार्केट संचालक याच्या मध्यस्तीने सभापती, उपसभापती आणि विकासक यांच्या घरी झाली बैठक
मुंबई APMC मार्केटमधील पाचहि बाजारपेठांचा पुनर्विकास होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेली अनेक वर्षांपासून बाजार समिती तोट्यात असल्याने उत्पन्न वाढीसाठी संपूर्ण बाजार घटकांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्याला अद्याप यश येताना दिसत नाही. तर आता बाजार समितीचा विकास करण्यासाठी सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, बांधकाम सभापती महादेव    जाधव, मसाला मार्केट संचालक विजय भुत्ता आणि बांधकाम व्यवसायिक भूपेन शहा यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  हि बैठक विजय भुत्ता यांच्या अध्यक्षतेखाली पामबीच येथील विकासकाच्या घरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  शिवाय बैठकीत पाचही बाजारपेठांच्या पुनर्विकासाची ब्लूप्रिंट प्रोजेक्टर द्वारे सादर करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच मुंबई APMC मार्केटचा विकास होणार असे दिसते.
नुकताच एका बाजार समिती सदस्याचा वाढदिवस पार पडला. या वाढदिवसानिमित्त शूभेच्छा देण्यासाठी आलेल्या बाजार समिती सभापती, उपसभापती, बांधकाम सभापती अशा काही लोकांना मसाला मार्केटमधील इमारतीच्या पुनर्विकासासाठी बांधकाम व्यवसायिकाच्या भेटीला हा सदस्य घेऊन गेल्याने बाजार घटकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुरुंगात गेलेल्या बांधकाम व्यवसायीकाच्या भेटीला हे लोक गेलेच कसे असा सवाल बाजार घटक करत आहेत. तर अशा व्यवसायिकाकडून बाजार घटकांची फसवणूक झाल्यास याला जबाबदार कोण राहणार असा सवाल विचारला जात आहे.
मुंबई APMC मार्केटचा विकास झाला पाहिजे यासाठी सर्वच बाजार घटक इच्छुक आहेत. बाजार समितीचा विकास झाल्यास बाजार घटकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळणार आहेत. परंतू स्वतःचे नुकसान करून अथवा फसवणूक होऊन विकास केला जावा अशी भावना मात्र कोणाचीही नाही. मुंबई एपीएमसी मार्केटमधील बाजारपेठांचा विकास करण्यासाठी काही संचालक शासनाची फसवणूक केलेला आणि तुरुंगात जाऊन आलेला बांधकाम व्यवसायीकाला आमंत्रण देत असल्याच्या चर्चा ऐकावयास येत होत्या. मात्र आता थेट बाजार समितीच्या कार्यकारी मंडळातील काही लोक व्यवसायिकाच्या भेटीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवाय हा बांधकाम व्यवसायिक खोट्या सातबारा प्रकरणात तुरुंगाची हवा खाऊन सध्या जामिनावर बाहेर आहे. याच बरोबर त्यांनी बेलापूर येथील भव्य गृहनिर्माण प्रकल्प फसवणूक केलेल्या प्रकरणावर कोकण आयुक्त यांनी उंचस्तरीय कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे हा व्यवसायीक बाजार घटकांची फसवणूक करणार नाही अशी शाश्वती आहे का? असा सवाल देखील बाजार घटक करत आहेत.
शिवाय अशी पार्श्वभूमी असताना काही लोक याच व्यवसायिकाला बाजारात आणण्यास आग्रही का? भाजीपाला, फळ, धान्य आणि मसाला या बाजारपेठांमधील काही व्यापारी बांधकाम व्यवसायीक आणि या क्षेत्रातील गुंतवणूकदार देखील असल्याने स्वतःच्या फायद्यासाठी अशाप्रकारचे बांधकाम व्यवसायिक बाजाराच्या पुनर्विकासासाठी आणले जात असल्याची चर्चा बाजारात सुरु आहेत. तर आता थेट सभापती त्यांच्या भेटीला गेल्याने विविध चर्चाना उधाण आले आहे. 
संचालक विजय भुत्ता आम्हाला भूपेन शहा या विकासकाकडे घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी कशा पद्धतीने पाचही मार्केटचा विकास होणार हे आम्हाला   दाखवले. मात्र याबाबत अंतिम निर्णय काय घ्यायच्या हे आमच्या हातात असणार असल्याचे बांधकाम समिती अध्यक्ष व संचालक महादेव जाधव यांनी सांगितले.