Crude Oil Inflation : महागाईपासून सूटका विसरुनच जा! पेट्रोल-डिझेल भडकणार?
जागतिक घडामोडींमुळे अनेक गरीब देश, विकसनशील देश भरडल्या जाणार आहेतच, पण अमेरिका आणि युरोपातील मोठ्या अर्थव्यवस्थांना (Big Economies) ही मोठा फटका बसणार आहे. रशिया-युक्रेन युद्धावरुन सुरु असलेल्या भूराजकीय घडामोडींचा हा परिपाक आहे. अमेरिकेसह युरोपवर दबावतंत्राचा वापर म्हणून कच्चा तेलाचे उत्पादन (Reduce of Crude Oil) घटविण्यात आले आहे. 1973 साली ओपेक संघटनेने अमेरिकेचा व्यवहार ठप्प पाडला होता. इतकी ताकद या देशांमध्ये आहे. रशियाच्या बाजूला झुकलेल्या या संघटनेच्या माध्यमातून नवीन खेळी खेळण्यात येत आहे. पण त्याचा मोठा फटका भारतालाही बसण्याची शक्यता आहे. भारतात इंधनाचे दर वाढल्यास महागाईचा भडका उडेल.
असा बसेल फटका
सौदी अरबसह 23 देशांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी याविषयीची घोषणा करण्यात आली. हे सर्व देश मिळून 19 कोटी लिटर कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात करतील. त्यामुळे इंधनाची किंमती प्रति बॅरल 10 डॉलरपर्यंत वाढतील. त्याचा भारतासह जगावर थेट परिणाम होईल. म्हणजे येत्या काही दिवसात देशात पेट्रोल-डिझेल महाग होईल.
तेल उत्पादन कपातीची कारणे काय
फेब्रुवारी 2022 पासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती 139 डॉलर प्रति बॅरल झाल्या. 2008 नंतर पहिल्यांदाच किंमती एवढ्या वाढल्या होत्या. अमेरिका आणि रशियाने त्यांचे राखीव कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात उतरवले. त्यानंतर किंमतीत घसरण झाली. त्यामुळे मार्च 2023 मध्ये किंमती घसरुन 75 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या.