मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमध्ये मार्केट अभियंत्यांचे दुर्लक्ष; होऊ शकतो मोठा अनर्थ
मुंबई एपीएमसी बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केट इमारत धोकादायक झाली आहे. त्यात जी विंग मधील पॅसेजमध्ये स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे बाजार घटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून व्यापारी देखील त्रस्त झाले आहेत. तर बाजारातील शौचालयाला रंगरंगोटी करायला बाजार समितीकडे पैसे आहेत. मात्र, धोकादायक स्लॅबला दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने बाजार घटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत बाजार समिती अभियंता विभागाला पत्र व्यवहार करून सुद्धा या कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप बाजार घटक करत आहे. त्यामुळे अभियंता विभागाने त्वरित लक्ष देऊन मोठा अनर्थ टाळण्याची मागणी जोर धरू लागली आहे.