मुंबई APMC चे उत्पन्न वाढवण्यासाठी भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा मार्केटच्या दप्तर तपासण्याची मागणी
मुंबई APMC मार्केटमधील धान्य आणि मसाला मार्केट सारखे कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केटच्या देखील दप्तर तपासण्याची मागणी संचालक राजेंद्र पाटील यांनी केली आहे. सध्या मुंबई बाजार समिती आर्थिक अडचणीत आहे. तर बाजार समिती वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैठका सुरु आहेत. मात्र, या बैठकांमधून कोणताच ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न कसे आणि कधी वाढणार असा सवाल बाजार घटक करत आहेत. शिवाय बाजार समितीचा कणा असलेला माथाडी आणि मापाडी कर्मचारी बेरोजगारीच्या वाटेवर आहे. बिनकामाच्या विविध प्रकल्पांवर करोडो रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याने तिजोरीत खळखळाट झाला आहे. मात्र, बाजार समितीच्या तिजोरीत पैसा येण्यासाठी या तिन्ही मार्केटची दप्तर तपासण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. तर जवळपास दिड हजार कोटी रुपयांची वाढ होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता बाजार समिती उत्पन्न वाढीसाठी या तपासणीचा अवलंब करणार असल्याचे दिसत आहे.
भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा मार्केटमध्ये जवळपास १ हजार गाडी शेतमाल आवक होत आहे. त्या तुलनेत पुरेसा सेस जमा होत नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पूर्वी पार पडलेल्या संचालक बैठकीत भाजीपाला सेस वाढीबद्दल दोन ते तीन तास चर्चा करण्यात आली. तर या ठिकाणी होत असलेल्या अनाधिकृत व्यापार देखील सेस वाढीला जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. तसेच या ठिकाणच्या किरकोळ बाजार/ कांदा-बटाटा, लसूण आणि एकाच मार्केटमध्ये दोन बाजारभाव यामुळे सुद्धा बाजार समितीचा प्रतिदिन लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तर फळ मार्केटमध्ये ग्राहकांऐवजी   वाहतूकदारांकडून चौकीवर सेसची भरणी केली जात असल्याने त्यात सुद्धा तफावत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा सेस फळ   मार्केटमध्ये देखील बुडत आहे. अशीच काहीशी परिस्थिती कांदा-बटाटा मार्केटमध्ये दिसत आहे. त्यामुळे बाजार समितीचा फायदा होणे कठीण असल्याचे दिसत आहे. तर अशा परिस्थितीत महसूल वाढीवर संचालक मंडळ काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.