अमेरिकेतून सर्वात मोठी बातमी, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक
अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका पोर्न स्टारला गुप्तपणे पैसे दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणी मॅनट्टन कोर्टात आज सुनावणी होती. या सुनावणीसाठी डोनाल्ड ट्रम्प कोर्टात हजर झाले. पण कोर्टात हजर होताच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आल्यानंतर वातावरणात तणाव निर्माण होऊ शकतं. ट्रम्प यांचे समर्थक आक्रमक होऊ शकतात अशा विचारातून मॅनहट्टन कोर्ट ते ट्रम्प टॉवरपर्यंत तब्बल 35 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: आपल्याला अटक होऊ शकते, असा दावा केला होता. पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स (Stormy Daniels) हिला गुप्तपणे पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स हिच्याशी डोनाल्ड ट्रंप यांचे अफेअर होते. तिच्याशी यौन संबंध ठेवल्याचा हा प्रकार आहे. या बदल्यात तिला 130,000 डॉलर देण्यात आले होते, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
न्यूयॉर्कची ग्रँड ज्युरी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला 2016 च्या $13 दशलक्ष पेमेंटमध्ये ट्रम्प यांच्या सहभागाची चौकशी करत आहे. रिपब्लिकन नेते ट्रम्प यांच्यासोबतच्या कथित लैंगिक संबंधांबाबत डॅनियल्स बोलू नये, यासाठी तिला पैसे देण्यात आले होते. ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांनी ही रक्कम डॅनियल्स हिला दिली होती. कोहेनने दावा केला की या सेटलमेंटबदल्यात त्यांना ट्रम्प ऑर्गनायझेशनने त्यांना $42 दशलक्ष नुकसानभरपाई आणि अतिरिक्त बोनस दिले.
डोनाल्ड ट्रम्प आज कोर्टात दाखल झाले. यावेळी त्यांना अटक करण्यात आली. ट्रम्प जामीनासाठी कोर्टात अर्ज सादर करण्याची शक्यता आहे. पण ट्रम्प यांच्या अटकेवरुन मॅनहट्टन कोर्टाबाहेर त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यांचे समर्थक हे ट्रम्प यांच्या बाजूने घोषणाबाजी करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत या मुद्द्यावरुन वातावरण तापताना दिसत असताना आज अखेर ट्रम्प यांना अटक झालीय.