कांदा प्रश्न पेटला, नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण; स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्वेच्छा मरणाच्या मागणीचं पत्र शेतकऱ्यांनी लिहलं आहे.
कांद्याबरोबरच कोथिंबीर आणि मेथीच्या दरातही मोठी घसरण
राज्यातील कांदाप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. तसेच स्वेच्छा मरणासाठी चांदवडमधील शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. कांद्याबरोबरच कोथिंबीर आणि मेथीला देखील दर मिळत नाही. दर नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मेथी आणि कोथिंबीर फुकटात वाटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
दरम्यान, अधिवेशनात कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितलं. बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्रे सुरु करण्यात येतील असंही त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसून आले. अद्याप नाफेडकडून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु झाली नसल्याची स्थिती दिसत आहे.